परफेक्शनिस्ट ‘आमिर खान’ सध्या खूप चर्चेत आहे. त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा बहुचर्चित चित्रपट ऑगस्ट महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता. ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ चित्रपटानंतर तब्बल चार वर्षांनी आमिरचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हणून त्याचे चाहते खूश झाले होते. पण या बिगबजेट चित्रपटाने प्रेक्षकांना निराश केले. आमिरच्या लाल सिंग चड्ढामध्ये बऱ्याच कमतरता होत्या. त्यात सोशल मीडियावरील बॉयकॉटच्या ट्रेंडचा नकारात्मक परिणाम देखील चित्रपटावर झाला. चित्रपटाला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी घेत आमिरने मानधनाचे पैसे परत केले.

टॉम हॅक्स यांचा ‘फॉरेस्ट गंप’ चित्रपट हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे भारतीकरण करायचा विचार अभिनेता अतुल कुलकर्णीच्या मनात आला. त्याने आमिरसमोर ही कल्पना मांडली. मग काही वर्षांनंतर फॉरेस्ट गंपच्या निर्मात्यांकडून अधिकृत हक्क मिळवून आमिर खानने त्याच्या टीमसोबत लाल सिंग चड्ढा हा चित्रपट बनवला. यात आमिरसह करीना कपूर, मोना सिंग, दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य असे कलाकार कास्ट करण्यात आले. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यावर काही तासांनी चित्रपटाला आणि आमिर खानला ट्रोल करायला सुरुवात झाली. हे प्रकरण वाढत ‘चित्रपट बॉयकॉट करावा’ अशी मागणी होऊ लागली. १८० कोटी रुपये खर्च करुन तयार केलेल्या चित्रपटाने फक्त ६० कोटी रुपयांची कमाई केली.

ओटीटीची वाढती प्रसिद्धी पाहता लाल सिंग चड्ढा ५-६ महिन्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मशी त्यासंबंधित करार होणार होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या हक्कांसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्सकडे १५० कोटींची मागणी केली होती. चित्रपटाला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे करारावरुन नेटफ्लिक्स आणि निर्माते यांच्यामध्ये वाद झाल्याचे देखील सांगितले जात होते. आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानचा लाल सिंग चड्ढा ‘२० ऑक्टोबर’ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने ८०-९० कोटी रुपये खर्च केले आहेत.

आणखी वाचा: Viral Video: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडवला रणबीर, आलियाचा रस्ता; बीफसंदर्भातील विधानामुळे महाकाल मंदिराबाहेर गोंधळ

लाल सिंग चड्ढा हा चित्रपट आमिरसाठी खूप खास होता. चित्रपटाच्या अपयशामुळे त्याचे आगामी चित्रपट पुढे ढकलण्यात आले आहेत. आमिर सध्या अमेरिकेमध्ये ब्रेक घेत आहे. या परदेश दौऱ्यानंतर तो पुढील चित्रपटांचे चित्रीकरण करणार आहे.

Story img Loader