‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानच्या प्रत्येक गोष्टीचं त्याच्या चाहत्यांना कौतूक असतं. वर्षांला एकच चित्रपट, मग त्या एकमेव चित्रपटातील एकमेव भूमिकेसाठी त्याने समरसून घेतलेली मेहनत या सगळ्या गोष्टी ओघाने येतातच. आणि मग चित्रपट प्रदर्शित झाला की चित्रपटगृहांबाहेर आमिरचा चित्रपट बघण्यासाठी रांगा लागतात. त्या चित्रपटाने न भूतो न भविष्यति कमाई केल्यावर तर आमिरला भरून येतं.  पण, एवढी मेहनत करूनही त्याचा एखादा चित्रपट प्रदर्शित झालाच नाही तर..
आमिरचा असाच एक अप्रदर्शित चित्रपट शनिवारी, ८ जून रोजी ‘ऑन अँड पिक्चर्स’ वाहिनीवर रात्री ८ वाजता दाखवण्यात येणार आहे. झील समूहाची वाहिनी असलेल्या ‘ऑन अँड पिक्चर्स’ने अशाप्रकारे आमिरचा अप्रदर्शित चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत एक नवाच पायंडा पाडला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला खुद्द आमिरनेही दाद दिली असून तो या चित्रपटादरम्यान वाहिनीवर उपस्थित असणार आहे. या चित्रपटाचे नाव काय, त्याचे दिग्दर्शन कोणी केले आहे, त्यात त्याची नायिका कोण असणार आहे, अशा सगळयाच गोष्टी अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही त्याच्या या चित्रपटाबद्दलची चर्चा सध्या वाढतच चालली आहे.
एखाद्या हिरोच्या चित्रपटात असाव्यात त्या सगळया गोष्टी नाटय़, अ‍ॅक्शन, प्रेम-प्रणय या चित्रपटात ठासून भरलेल्या आहेत. मात्र, तराही त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होऊ शकला नव्हता. आता तो थेट छोटय़ा पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आमिरचा चित्रपट छोटय़ा पडद्यावर प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘झील’चे मार्केटिंग प्रमुख आकाश चावला यांनी ‘ऑन अँड पिक्चर्स’ ही प्रसारित झाल्यापासून अवघ्या वर्षभरातच आमिर खानचा कोणीही न पाहिलेला चित्रपट पहिल्यांदा दाखवण्याचा मान या वाहिनीला मिळणार आहे. एवढेच नव्हे तर खुद्द आमिरनेही या कल्पनेला पाठिंबा दिला असून तो या चित्रपटादरम्यान लोकांचे प्रश्न ऐकून त्यांना उत्तरेही देणार आहे, त्यांच्याबरोबर आपल्या चित्रपटातील अनुभवांबद्दल गप्पाही मारणार आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे आकाश चावला यांनी म्हटले आहे.