महिलांवर होणा-या अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी पुरूषांना सर्वप्रथम आपली मनोवृत्ती बदलावी लागेल, असे मत बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले आहे. यासाठी धूम-३ अभिनेता आमिर खानने ‘वन बिलियन राइझिंग कॅम्पेन’ या महिला अत्याचाराविरूद्धच्या मोहिमेसाठी चित्रफितीच्या माध्यमातून संदेश दिला आहे. स्त्रियांवर हात उचलण्यात कोणताही पुरूषार्थ नसून उलट अशा घटना तुमचा भ्याडपणा सिद्ध करतात, असा संदेश आमिरने या चित्रफीतीतून दिला आहे. तसेच हा संदेश देताना त्याने आपल्याला एक खरा पुरूष म्हणून अधिक संवेदनशील होता आलं पाहिजे असा विचार सुद्धा मांडला आहे.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच समाजात याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे राबविण्यात येणा-या या मोहिमेत मागील वर्षी गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २०७ देशांतील १ अब्ज लोकांनी सहभाग घेतला होता. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही जागतिक मोहिम राबविण्यात येत आहे. जगातील प्रत्येक तीन महिलांपैकी एक महिला ही आपल्या जीवनकाळात बलात्कार अथवा हिंसेसारख्या घटनांना बळी पडलेली असते. यावेळी आमिर खानने आपल्या चाहत्यांना अधिकाअधिक संख्येने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात महिलांवरच्या अत्याचार अब्जोंच्या संख्येने आवाज उठतील असा विश्वास व्यक्त केला.

Story img Loader