सुपरस्टार आमिर खानची पत्नी किरण रावला आमिरसारख्या प्रसिध्द व्यक्तीबरोबर राहणे कठीण जात आहे. ‘कॉफी विथ करण’च्या आगामी भागात करणने आमिरबरोबर राहणे सोपे आहे का असा प्रश्न विचारला असता, आमिरने याला होकारार्थी उत्तर दिले. परंतु, या शोमध्ये आमिरबरोबर आलेली त्याची पत्नी किरणचा याबाबतचा दृष्टीकोन वेगळा आहे. ती म्हणाली, एवढ्या भव्य व्यक्तीमत्वाच्या पुरूषाबरोबर राहणे कठीण आहे. आमिरच्या आयुष्यात येण्या आगोदर मी एक सर्वसाधारण आयुष्य जगत होते. आमिरबरोबर राहण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागल्या का, याबाबत बोलतांना ती म्हणाली, होय! हे खूप कठीण होतं. मी कधीच एवढ्या दृढपणे कोणात गुंतले नव्हते. या आधी मी कोणाबरोबर राहिलेली देखील नाही. माझ्यासाठी हा पूर्णपणे नवा मार्ग होता. त्याचबरोबर आमिर सुध्दा आयुष्यातील एका कठीण काळातून जात होता. पुढे ती म्हणाली, त्याच्या आयुष्यातील तो कठीण काळ होता. भावनात्मक दृष्ट्या तो एका नाजूक वळणावर होता. तो असा एक विस्तव झाला होता, ज्याचा कधी ही भडका झाला असता. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आमिर आणि किरणने दिलखुलास गप्पा मारल्या. ही जोडी पहिल्यांदाच करणच्या शोमध्ये येत आहे. येत्या रविवारी रात्री ९ वाजता हा भाग ‘स्टार वर्ल्ड’ चॅनलवर दाखविण्यात येणार आहे.

Story img Loader