मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जीवनपट त्याचबरोबर राजकारण आणि मनाला भिडणा-या विषयांवर सखोल भाष्य करणा-या चित्रपटांची रांग लागलेली असताना ब-याच कालावधीनंतर एक विनोदीपट प्रदर्शित झाला आहे. आंधळी कोशिंबीर आज प्रदर्शित झाला. बराच अवधीनंतर आंधळी कोशिंबीरच्या निमित्ताने पक्व परंतु सुसंस्कृत प्रासंगिक व भाषिक विनोद आणि घरातल्या सर्वांनाच हास्याचा आनंद देणारी कथा पाहावयास मिळणार आहे. समाजामध्ये अनेक नातेसंबंधांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असतात. त्यामुळे त्यांच्यामधील नातेसंबंध विकसित होत असताना त्यांच्या जाणीवा, विचार बदलत असतात. जेव्हा असे चार वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन एक कुटुंब बनते, तेव्हा एकच गोंधळ उडतो. अशा गोंधळातून निर्माण झालेला विनोदीपट म्हणजे आंधळी कोशिंबीर.
ही कथा रेंगाळते ती आठ मुख्य पात्रांभोवती. भांडखोर स्वभाव असणारे बापू (अशोक सराफ) आणि त्यांचा मुलगा रंगा (अनिकेत विश्वासराव) हे एका प्रशस्त बंगल्यात राहत असतात. रंगाकडे काहीच काम नसल्यामुळे तो व्यवसाय करण्याच्या विचारात असतो. त्याला साथ लाभते ती त्याच्या वैचारीक मित्र वश्याची (हेमंत ढोमे). मात्र, प्रत्येक गोष्टी सांभाळून ठेवणारे अगदी गाडी घरात असूनही तिचा वापर न करणारे बापू रंगाला व्यवसायासाठी काही पैशाची मदत करत नाहीत. त्यामुळे हे दोघे गोरक्ष नावाच्या (ऋषिकेश जोशी) स्थानिक गुंडाकडून पैसे उधार घेतात. उधारी घेतलेल्या पैशांपेक्षा त्याचे व्याजच इतके होते की यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. आता हे कर्ज फेडायचे कसे म्हणून स्वतः गोरक्षच या दोघांना एक कल्पना सुचवतो. त्यासाठी ते बापूंचे घर त्यांच्या नकळत गहाण ठेवण्याचे ठरवतात. तेव्हा एन्ट्री होते ती वकिल मारणेची (आनंद इंगळे). पेशाने वकील पण मनाने कवी असलेला मारणे कॉलेजच्या दिवसापासूनच शांतीवर (वंदना गुप्ते) प्रेम करत असतो. दिवसभरात तिच्यावर डझनभर कविता करून तिला त्रास देणे आणि तिच्या फोटोची पूजा करणे हा मारणेचा दिनक्रम. शांतीला लग्नाच्या स्वप्नात सतत रमत असलेली मात्र डोक्याने अजूनही लहान अशी राधिका (मृण्मयी देशपांडे) मुलगी असते. आता या घोळात घोळ निर्माण होतो तो रंगा आणि वश्याच्या भन्नाट कल्पनेमुळे. बापूंकडून घराच्या कागदावर सह्या करून घ्यावयाच्या असल्याने रंगा-वश्या हे बापूचं आणि शांतीबाईंच भांडण लावायच ठरवतात. जोपर्यंत बापूंना भांडणात कोणी हरवत नाही तोपर्यंत त्यांचं खच्चीकरण होणार नाही, असा या दोघांचा समज असतो. आणि त्यांना भांडणात कोणी हरवू शकतं ते म्हणजे शांतीबाई. पण बापू-शांती भांडण करण्याऐवजी एकमेकांच्या प्रेमात पडतात. मूळतः हे दोघे वेडे असून ते त्यांच्या पहिल्या जोडीदारासारखे दिसत असल्याचे या दोघांना रंगा-वश्याने सांगितलेली असतं. प्रेमात पडल्यावर हे दोघ भांडणाऐवजी एकमेकांची अधिक काळजी घेऊ लागतात. मग त्यांना वेगळ करायला हवं या निर्णयावर पोहोचल्यावर हे दोघेही वेडे नसल्याचे सिद्ध करण्यासाठी म्हणून मंजूला (प्रिया बापट) रंगा घेऊन येतो. गोरक्षची बहिण मंजू हिच्या डोक्यात अभिनयाच खुळ असतं. प्रत्येक अभिनय हा खरा वाटला पाहिजे, असं मत असणारी मंजू रंगाची मदत करायला तयार होते. मदत कसली तिला तर तिचा अभिनय दाखविण्याची एक संधीच मिळते. पुढे सुरु होते ती नात्यांच्या गुंतागुंतीची आंधळी कोशिंबीर.
पुढे जाऊन यांच्या जोड्या कश्या बनतात…. शांतीबाई मारणेसोबत जातात की बापूंसोबत….. रंगाला घराच्या कागदांवर बापूंच्या सह्या मिळतात की अजून काही गोंधळ उडतो…. मंजू तिच्या अभिनयाची जादू चालविण्यात यशस्वी होते का… डोक्यात लग्नाच खुळ असलेली राधिका वश्याला आपल्या वशमध्ये करते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि निखळ हास्याचा आनंद लुटण्यासाठी हा चित्रपट पाहावयास हवा.
आंधळी कोशिंबीर… शीर्षकचं इतकं वेगळ आणि आकर्षक असल्यामुळे चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरतो. नुसती ताणूनच धरत नाही तर चित्रपट पाहताना आपल्याला त्याचा पुरेपूर अनुभव त्यातील विनोदातून होतो. एखाद्याला रडवणं सोप पण हसवण कठीण म्हणतात ना. प्रेक्षकांना जबरदस्तीने हसवण्याचा अजिबात प्रयत्न न करता प्रत्येक विनोदाला टायमिंग आहे. त्यामुळे आपल्याला अगदी पोट धरुन हसू येईल याची काळजी लेखक आणि दिग्दर्शकाने घेतलेली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अवधूत गुप्तेने दिलेले शीर्षक गीत हे मराठीतील रॉक गीत झाले आहे. अवदूतचा आवाज म्हणजे रॉक संगीताला साजेसा. त्यामुळे अतिशय सुंदर आणि रॉकिंग चाल लाभलेले हे गीत आपल्याला त्याच्या तालावर थिरकायला भाग पाडते. जणू मराठीतील एक पार्टी साँग म्हणूनच हे वाजावल जाईल. अभिनय आणि अजिंक्य देव या दिग्दर्शक-अभिनेता बंधू जोडीनंतर मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका नव्या जोडीची भर पडली आहे. ती म्हणजे आनंद आणि आदित्य इंगळे. पहिल्यांदाच दिग्दर्शन केलेल्या आदित्यच्या या चित्रपटात आनंद इंगळेने काम केले आहे. एक भाऊ दिग्दर्शक तर दुसरा अभिनेता. पण, आदित्यने पहिल्यांदाच दिग्दर्शन करूनही आपल्या कामाची कमान अतिशय उत्कृष्टरित्या पेलून एक धमाल चित्रपट तयार केला आहे. ब-याच कालावधीनंतर विनोदसम्राट अशोक सराफ हे विनोदी भूमिकेत पाहावयास मिळाले. त्यामुळे विनोदी भूमिकांपासून काहीकाळ दुरावलेले आणि आपल्या अभिनयाबाबत अतिशय चोखंदळ असलेले अशोक सराफ यांना पडद्यावर पाहताना आनंदच होतो. आपल्या चाहत्यांना अभिनयाने कसे मंत्रमुग्ध करावे हे त्यांना लिलया जमते. त्यांना तितकीच चांगली साथ मिळाली ती वंदना गुप्ते यांची. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दिग्गज कलाकारांच्या छत्रछायेत अनिकेत विश्वासराव, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे, ऋषिकेश जोशी, आनंद इंगळे या कलाकारांचा अभिनयही तितकाच तोडीसतोड झाला आहे. मृण्मयी पहिल्यांदाच एका वेगळ्या लूकमध्ये दिसतेय. अगदी बालीश वाटणारी मृण्मयी मनाला मोहून जाते. सारांश काय तर चित्रपटाची पटकथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे तुम्हाला मनोरंजनाची पूर्ण हमी मिळते. आठ पात्रांमध्ये रंगलेली आंधळी कोशिंबीर ही या आठवड्याची मेजवानीच आहे.
दिगदर्शन- आदित्य इंगळे
कलाकार- अशोक सराफ, वंदना गुप्ते, अनिकेत विश्वासराव, प्रिया बापट, हेमंत ढोमे, आनंद इंगळे, मृण्मयी देशपांडे, ऋषिकेश जोशी
संगीत- नरेंद्र भिडे आणि अविनाश -विश्वजीत
निर्माता- अनुया म्हैसकर