छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘पोरस’ त्यातील स्टारकास्टमुळे चांगलाच चर्चेत राहिला. आता या मालिकेत एका नव्या चेहऱ्याचा समावेश होणार आहे. हा नवा चेहरा म्हणजे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अॅरॉन डब्ल्यू. रीड. ‘पोरस’ ही मालिका त्यातील सर्वोत्तम व्हिज्युअल्ससाठीच प्रसिद्ध आहे. आता या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कुस्तीपटूमुळे मालिकेला अधिक लोकप्रियता मिळण्यास मदत होईल असं म्हणायला हरकत नाही.
अॅरॉन डब्ल्यू. रीड या मालिकेत एका पारसी योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. तो राजा कनिष्क आणि पोरससोबत लढतानाही पाहायला मिळणार आहे. अॅरॉन हा माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू आणि जगातील सर्वांत उंच बॉडी बिल्डर आहे. त्याने सात वेळा बॉडी बिल्डिंग चॅम्पियनचा किताब जिंकला आहे. जेव्हा तो चार वर्षांचा होता, तेव्हा त्याला ल्युकेमिया झाला होता. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत त्याला कीमो थेरेपी घ्यावी लागली. व्यायाम आणि मेहनतीच्या जोरावर त्याने आजाराशी झुंज दिली. उपचाराच्या जोरावर कॅन्सरवर त्याने मात दिली.
अॅरॉनची उंची ६.७ फूट इतकी आहे. ‘पोरस’च्या सेटवर तो सहकलाकारांसोबत हिंदी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. सेटवरही त्याच्या डाएटची विशेष काळजी घेतली जात आहे. पोषक आहार आणि जिमचीही व्यवस्था सेटवर करण्यात आली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान अॅरॉनने निर्मात्यांची भेट घेतली होती. त्याच भेटीदरम्यान ‘पोरस’ मालिकेतील भूमिकेचा प्रस्ताव निर्मात्यांनी त्याच्यापुढे ठेवला.