बॉलिवूडच्या ‘आशिकी-२’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला गायक अंकित तिवारी याला गेल्या आठवड्यात बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता जामीन मिळविण्यासाठी अंकित तिवारीकडून सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. स्थानिक मॅजिस्ट्रेटच्या निर्णयानंतर न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या अंकितने आपल्याला या प्रकरणात चुकून गोवण्यात आल्याचे अर्जात म्हटले आहे. अंकितच्या म्हणण्यानुसार त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या तरूणीचे लग्न झाले असून तिला एक मुलगासुद्धा आहे. तसेच अंकितची प्रेयसी असण्याचा दावा करणाऱ्या या तरूणीच्या तक्रारीत अनेक विरोधाभास असल्याचे अंकितने म्हटले आहे. बलात्काराच्या आरोपावरून अंकित तिवारीला आणि सदर तरूणीला धमकावल्याच्या आरोपावरून अंकितचा भाऊ अंकुर तिवारीला मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी गाजलेल्या आणि तरूणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘आशिकी २’ या चित्रपटातील ‘सून रहा है ना तू’ या गाण्याने गायक अंकित तिवारी प्रकाशझोतात आला होता.

Story img Loader