मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्याचे स्पष्ट मत मांडताना दिसतो. नुकतंच आस्ताद काळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे तो चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आस्ताद काळे हा फेसबुकवर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकतंच आस्तादने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका प्रसिद्ध मराठी वाहिनीवरील मालिकेबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. यात त्याने त्या अभिनेत्याच्या अभिनयाबद्दल टीका केली आहे.

आस्ताद काळेची पोस्ट

“झी मराठीवरील एका मालिकेतील त्या एका नटानी साकारलेल्या पात्राच्या वाक्यांपुरती सबटायटल्स ची सोय करा बुवा. काय बोलतो कळत नाही. ता.क:- मी ती मालिका बघत नाही. काल माझ्या आईनी लावली होती, तेव्हा तीमधले एक-दोन प्रसंग भोगले”, असे आस्ताद काळने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान आस्ताद काळेच्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत ती मालिका कोणती हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी आस्तादच्या या पोस्टवर सहमती दर्शवली आहे. काही नेटकऱ्यांच्या कमेंटनुसार, आस्तादची ही पोस्ट तू तेव्हा तशी या मालिकेसंदर्भात आहे. ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका सुरु झाल्यापासून अनामिकाचा नवरा आकाशचा सातत्याने उल्लेख झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर आता त्याची या मालिकेत एंट्री झाली आहे. या मालिकेत आकाशची भूमिका अभिनेता अशोक समर्थ साकारताना दिसत आहे. मात्र त्याच्या अभिनयावर प्रेक्षकांनी टीका केली आहे. त्याचे संवाद ऐकायलाच येत नसल्याच्या तक्रारीही प्रेक्षक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aastad kale share facebook post talk about zee marathi tv serial actor dialogue delivery nrp