मराठी चित्रपट नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी वाखाणले जातात. खास महिला दिनाच्या निमित्ताने झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांनी ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण या गोष्टींना प्रोत्साहन देत तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन कष्टाळू जीवनावर आधारित हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सत्यघटनेवर आधारित ‘आता थांबायचं नाय!’ या शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रूपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महिला सक्षमीकरणावर आधारित या चित्रपटाचा आशय आणि भूमिका यासंदर्भात बोलताना रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, ‘मला वाटतं जितकं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते तितकं अजून कोणीच घेऊ शकत नाही. आज ती प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, सर्वांना सोबत घेऊन प्रगती करते आहे. टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे, खास महिलादिनी आपण निश्चय करूया की आपण असंच एकमेकांना समजून घेत एकमेकांच्या प्रगतीचे आणि समृद्धीचे खुल्या मनाने साक्षीदार होऊया.’ तर ‘आजची स्त्री सक्षम आणि सबळ आहेच, तिला अपेक्षा आहे ती फक्त प्रोत्साहनाची. एका दिवसाच्या शुभेच्छांनी जग बदलणार नाही. त्प्रत्येक स्त्रीला रोज मिळणाऱ्या आदरपूर्वक वागणुकीने बदल नक्कीच घडू शकतो’, असं मत पर्ण पेठे हिने व्यक्त केलं.