रेश्मा राईकवार
मी म्हणजे कोण? या साध्या प्रश्नाचं उत्तर खचितच साधं नाही. इथे प्रत्येकाची आपली एक गोष्ट आहे. त्याच्या जन्मापासून नव्हे त्याच्या आधी म्हणजे त्याला जन्माला घालणाऱ्यांपासून ही गोष्ट सुरू होते. मग ती व्यक्ती ज्या काळात जन्माला आली आहे तेव्हाचे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ, त्याच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर घडत जाणाऱ्या देशव्यापी वा विश्वव्यापी घटना, वैयक्तिक आयुष्यातील उलथापालथ, या सगळय़ातून येत जाणारी समज-उमज असे कितीतरी धागेदोरे एकमेकांत घट्ट विणत जात ज्याची त्याची गोष्ट तयार होते. प्रत्येकाची गोष्ट कितीही वेगळी असली तरी त्यातलं शहाणपण जोखणं महत्त्वाचं.. आणि तेच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आशीष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या प्रयोगशील चित्रपटातून करण्यात आला आहे.
‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट विविध अर्थाने मराठीतला वेगळा प्रयोग म्हणायला हवा. त्याच्या कथेपासून ते चित्रपटाच्या मांडणीचा जो बाज आहे त्यातही प्रयोग करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने त्याची सुरुवात होते ते पाहता थोडासा विनोदी, क्वचित नाटकाच्या फॉर्मची जाणीव करून देणारा, पुन्हा चित्रचौकटीतून बोलका होणारा आणि तरीही प्रकृतीने चिंतनात्मक असा हा पावणेदोन तासाच्या चित्रप्रयोगाचा प्रवास आहे. दिग्दर्शक म्हणून परिचित असलेले परेश मोकाशी या चित्रपटात लेखक आणि सूत्रधार अशा दोन भूमिकांमध्ये जाणवतात. दिग्दर्शक आशीष बेंडे यांचा स्वतंत्र दिग्दर्शन असलेला हा पहिलाच चित्रपट आहे आणि आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नात त्यांनी आशयानुरूप चित्रपटाच्या मांडणीत प्रयोग करण्याचं धाडस दाखवलं आहे. चित्रपटाच्या नावातच आत्मकथनाचा उद्देश स्पष्ट असल्याने सूत्रधार म्हणजे कथानायकाच्या तोंडून त्याची गोष्ट ऐकता ऐकता ती आपल्यासमोर उलगडत जाते. दिग्दर्शक आशीष बेंडे यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या भवताली घडलेल्या घटनांवरून प्रेरित कथा असल्याने इथे कथानायकाचे नावही आशीष बेंडेच आहे. ढोबळमानाने जन्मापासून ते शाळेत जाण्यापर्यंतचा एक टप्पा, शाळकरी वयात घडणाऱ्या घटना, मित्रमैत्रिणींचा प्रभाव अशा पद्धतीने आशीषची गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते.
शाळकरी वयात नाटकातील भूमिकेची हौस भागवत असताना एका क्षणी आशीषची वर्गमैत्रीण सृष्टी भीतीने त्याचा घट्ट हात धरते. आयुष्यात पहिल्यांदाच ज्या मुलीने आपला हात घट्ट धरला तिची छबी त्याच्या मनात कायमची कोरली जाते. आशीष तेव्हापासून सृष्टीच्या प्रेमात आकंठ बुडून जातो. शाळा म्हणजे सृष्टी हे असं एकांगी चिरकाल टिकणारं प्रेम जपण्याचा आशीषचा प्रयत्न एका टप्प्यावर त्याच्या मित्रांच्याही ध्यानी येतो. मग हे प्रेम प्रकरण यशस्वी करण्याचा आशीषच्या मित्रांचा आटापिटा, सृष्टीचं मन जिंकण्यासाठी आणि वाटेतील सगळे अडथळे पार करण्यासाठी हरएक प्रयत्न करणारा, स्पर्धा जिंकणारा प्रेमवीर आशीष अशी हळूहळू ही प्रेमकथा पुढे सरकत राहते. अर्थातच आशीषच्या प्रेमाची गोष्ट हा खूप वरवरचा भाग आहे. एखाद्या मुलाला आपण कोण आहोत? म्हणजे समाजातलं आपलं अस्तित्व आपला धर्म, जात, आपली आर्थिक पत, कौटुंबिक मूल्यं या सगळय़ाची जाण प्रत्येकाला कशी होत जाते? ज्याच्या त्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था वा परिस्थितीनुसार घडत जाणारी त्याची विचारसरणी, देशभरात घडणाऱ्या घटनांचा मुलांवर – त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर जाणवण्याइतपत होणारे परिणाम अशा कित्येक गोष्टींवर लेखक – दिग्दर्शक सूचक भाष्य करत राहतात. नव्वदच्या दशकात जन्माला आलेल्या आशीषचे आई-वडील, त्याच्या आई-वडिलांच्या विचार-वर्तनावर त्याच्या आजी-आजोबा वा पणजोबांपासूनच्या व्यक्तींनी घेतलेले निर्णय-वर्तन यांचा होणारा परिणाम अशा बारीकसारीक घटना दिग्दर्शक दाखवतो. तेव्हा ही गोष्ट निश्चितच आशीषपुरती मर्यादित राहात नाही. तिथे प्रत्येक माणूस आपल्याला त्या त्या घटनांमधून, त्याच्या आठवणींमधून पडताळून पाहतो. इथे धर्म-जात-प्रांत यापलीकडे माणूस म्हणून घडवण्यासाठी शिक्षण किती मोलाची भूमिका बजावतं इथपासून ते कुठल्याही घटनेचा सारासार विचार करणं, परंपरा-रूढींचा स्वीकार-अस्वीकार करतानाही आपली एक ठाम भूमिका घेणं असे कितीतरी पैलू या आत्मकथेच्या ओघात उलगडत जातात. आणि हेच या आत्मकथनाच्या प्रयोगाचं वैशिष्टय़ म्हणता येईल.
चित्रपटाची कथा साधी-सरळ असली तरी त्यातून जे सांगायचं आहे ते पोहोचवणं खचितच सोपं नाही. त्यामुळे एकूणच चित्रपटाच्या मांडणीसाठी दिग्दर्शकाने आणि लेखकाने वापरलेला फॉर्म निश्चितच वेगळा आहे. शिवाय, शाळकरी मुलांच्या दृष्टिकोनातून जग पाहणं वा दाखवणं हे अवघड असलं तरी तो भाव प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो. ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या बाबतीत हा फॉर्म आणि वास्तववादी शैली पण तिरकस, नर्मविनोदी क्वचित उपरोधिक भाष्य करत आपली कथा रंगवण्याचा हा प्रयोग चांगला जमला आहे. चित्रपटातील बालकलाकारांपासून ते मोठय़ा कलाकारांपर्यंत सगळय़ांच्या सहज अभिनयामुळे ही गोष्ट पडद्यावरही छान साकारली आहे. प्रयोगाचा हा प्रयत्न शेवटाकडे येताना काहीसा विनाकारण ताणल्यासारखा वाटतो. त्यातील वैश्विक संदर्भ जोडून घेताना आशीष मागे राहतो. त्यामुळे ती ना धड आशीषची राहात ना देशाची.. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे या साध्या-सरळ वाटणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’मधला विचार अधिक महत्त्वाचा आहे. आणि चित्रपटाच्या एकूण मांडणीमुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत तो सहजपणे पोहोचवण्याचा लेखक – दिग्दर्शकद्वयीचा प्रयत्नही फळेल असं वाटतं.
आत्मपॅम्फ्लेट
दिग्दर्शक – आशीष बेंडे
कलाकार – मानस तोंडवळकर, ओम बेंडखळे, खुशी हजारे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे, केतकी सराफ.