गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री सायली संजीवच्या आगामी ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात सायली मुख्य भूमिकेत झळकणार असून प्रणव रावराणे तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर या चित्रपटातील गाणंही प्रदर्शित झालं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटात सायली हरीप्रिया ही भूमिका साकरत असून प्रणवने वसंत बापूसाहेब खाटमोडे ही व्यक्तीरेखा साकारली आहे. विनोदाचा भरणा करण्यात आलेल्या या चित्रपटातील ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर आहेत. प्रसिद्ध कवी नारायण पुरी यांच्या ‘प्रिये’ या कवितेने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. हेच नारायण पुरी मोबाईलच्या स्मॉल स्क्रीन नंतर आता थिएटरची बिग स्क्रीन गाजवायला तयार झाले आहेत. ‘आटपाडी नाईट्स’ या मराठी चित्रपटातून त्यांचे गीतकार म्हणून पदार्पण होत आहे. थोडक्यात सांगायचे तर ‘प्रिये’ नंतर ‘प्रेमाचा जांगडगुत्ता ग, जीव झाला खलबत्ता ग, उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग’ या ओळी तरुणाईला झिंगायला लावणार हे निश्चित.

‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या गीताला विजय गवंडे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायक आदर्श शिंदे आणि वैशाली माडे यांच्या खास शैलीतील गायकीमुळे या गाण्याला चार चाँद लागले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, या ठेका धरायला लावणाऱ्या गाण्याची लक्षवेधी कोरिओग्राफी राहुल ठोबरे आणि संजीव होवलदार यांनी केली आहे,

मायदेश मीडिया निर्मित ‘आटपाडी नाईट्स’ मध्ये प्रणव रावराणे, सायली संजीव, संजय कुलकर्णी, छाया कदम, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, योगेश इरतकर, विठ्ठल काळे, जतिन इनामदार, प्रशांत जाधव, शितल कलापुरे, चैत्राली रोडे, श्वेता परदेशी, बालकलाकार ओम ठाकूर, स्व. विवेक राजेश, डॉ. सुधीर निकम, अनुजा प्रभूकेळुसकर आणि सुबोध भावे यांच्या भूमिका आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे कथानक असलेला ‘आटपाडी नाईट्स’ येत्या २७ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aatpadi nights new song out sayali sanjiv and pranav raorane ssj