मराठी खाजगी दूरचित्रवाणीच्या इतिहासातलं मानाचं पान ठरलेली मालिका म्हणजे आभाळमाया. कुटुंबातलं एकमेकांबद्दलचं प्रेम, आनंद, हलकंफुलकं वातावरण आणि वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिरेखा यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आणि मराठी घराघरांत आवर्जून बघितली गेलेली आभाळमाया ही मालिका आजही मराठी मनाच्या हृद्यात आपलं स्थान टिकवून आहे. साधी सरळ कथा, चटकदार संवाद, उत्तम अभिनय, नेटके दिग्दर्शन यामुळे ही मालिका हटके ठरली. अल्फा आणि आताच्या झी मराठीवरील या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडीत काढले. या मलिकेने आपल्या १६ वर्षाच्या यशपूर्तीचा आनंदोत्सव नुकताच मालिकेतील प्रमुख कलाकांरासह लेखक, गीतकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात साजरा केला.
या शानदार सोहळ्यात प्रत्येक कलाकार आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आपला आभाळमायाचा हृद्य प्रवास उलगडून दाखवत होता. आभाळमाया मालिकेचे दिग्दर्शक विनय आपटे यांची आठवण याप्रसंगी साऱ्यांनाच जाणवत होती. मालिकेचे संकल्पक आणि निर्माते अच्युत वझे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत वन ट्री मिडिया या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून होणारा आपल्या नव्या प्रवासाबद्दलही माहिती दिली. मालिका, चित्रपट, रंगभूमी, इव्हेंट, डिजिटल व्यासपीठ अशा वेगवेगळ्या प्रातांत वन ट्री मिडिया मुशाफिरी करत उत्तम कलाकृती रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. यातल्या काही प्रकल्पांचा श्रीगणेशा करण्यात आल्याची माहिती वझे यांनी यावेळी दिली. रसिकांना चांगलं काहीतरी देण्याच्या उद्देशाने आभाळमाया मालिकेची निर्मिती केली. आपण जे काही करत आहोत ते चांगलंच आहे हा विश्वास प्रत्येकाने दाखवला त्यामुळेच या मालिकेने रसिकांची मने जिंकली असे सांगत यापुढे वन ट्री मिडिया च्या माध्यमातून अभिरुचीसंपन्न कलाकृती आणण्याचा निर्माते मानस अच्युत वझे यांनी यावेळी बोलून दाखवला.
या मालिकेने अनेक दिग्गज कलाकार मराठी मनोरंजन सृष्टीला दिले. आज मागे वळून पहताना अशी मालिका पुन्हा पहायला मिळावी हा रसिक आग्रह मान्य करत आभाळमायाच्या नात्यांचा हा कोलाज पुन्हा उलगडण्याचा मानस या सोहळ्यात अच्युत वझे यांनी बोलून दाखवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा