२००२ सालच्या ‘हिट अॅण्ड रन’प्रकरणी सत्र न्यायालयाकडून अभिनेता सलमान खानला शिक्षा सुनावण्यात आल्यावर जवळजवळ सर्व बॉलिवूड सलमानच्या बाजूने उभे असल्याचे दिसले, तर दुसरीकडे गायक अभिजीत भट्टाचार्यने टि्वटरवर मुंबईतील बेघरांबाबत असंवेदनशील संदेश पोस्ट करून विवादाला तोंड फोडले. फुटपाथवर झोपणार तर कुत्र्याचेच मरण येणार, अशा आशयाचे टि्वट अभिजीतने पोस्ट केले. या टि्वटमुळे समाजातील अनेक स्तरांवरून असंतोष प्रकट झाल्याने नंतर अभिजीतने माफी मागितली. या सर्व प्रकाराविषयी आपल्याला खेद असल्याची भावना व्यक्त करीत तो म्हणाला, जर का मी गरिबीची चेष्टा केली असेल आणि माझ्याकडून कठोर शब्दांचा वापर झाला असेल तर तो कोणाचे समर्थन करण्यासाठी झालेला नाही. गरीब माणसे ज्याप्रमाणे फुटपाथवर झोपतात ते पाहून मला राग येतो. मी रागाच्याभरात त्यांच्याविषयी अपशब्द बोललो. यासाठी मला खूप दु:ख होत असून मी हात जोडून त्यांची माफी मागतो.
सलमान खानच्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणी बेघरांना जबाबदार धरणाऱ्या अभिजीतच्या टि्वटबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिसाद उमटले. समाजमाध्यामांनी अभिजीतच्या या कृत्याला असंवेदनशील कृत्य संबोधले. ‘कुत्रे रस्त्यावर झोपले तर कुत्र्याचच मरण मरतील. रस्ते हे गरिबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते, म्हणून मी रस्त्यावर झोपलो नाही.’ अशी मुक्ताफळे अभिजीतने टि्वटरवर उधळली होती. आपल्या या विवादास्पद टि्वटची बाजू सांभाळण्यासाठी अभिजीतने रात्री पुन्हा टि्वट केले, ज्यात त्याने ‘कोणत्याही व्यक्तीस कुत्र्याचे मरण येता कामा नये’ असा संदेश लिहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा