अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अनेक महिलांनी त्यांचा आवाज उठविला आहे. सध्या #MeToo या मोहिमेअंतर्गंत अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. यामध्येच गायक अभिजीत भट्टाचार्यावर एका महिलेने गैरवर्तनाचा आरोप केला आहे.

२० वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ मध्ये कोलकाता अ‍ॅण्टी क्लॉक नाईट क्लब या पबमध्ये अभिजीतने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. इतकंच नाही तर त्यांनी बळजबरीने माझं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप या महिलेने केला आहे.

‘अभिजीत हे माझ्या मैत्रिणीचे शिरीनचे मित्र होते. त्यामुळे शिरीनने मला अभिजीत यांना एक निरोप देण्यास सांगितला होता. हाच निरोप मी अभिजीत यांना दिला आणि डान्सच्या मंचाकडे वळले. मी मंचावर जाऊन काही वेळ होत नाहीत. तेवढ्यात अभिजीत तेथे आले आणि डान्स करु लागले. यावेळी मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे निघाले. मात्र अभिजीत माझा पाठलाग करत होते. इतकंच नाही तर मी डान्स करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी माझा हात धरुन मला धमकी दिली आणि बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला’,असा आरोप या महिलेने केला आहे.

दरम्यान, अभिजीतने हे आरोप फेटाळून लावले असून ‘मी आयुष्यात कधीच पबमध्ये गेलो नाही’, असं अभिजीतने म्हटलं आहे. सध्या कलाविश्वामध्ये अनेक अभिनेत्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप करण्यात आला आहे. त्यात रजत कपूर, विकास बहल, आलोक नाथ यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे.

Story img Loader