Abhijit Bhattacharya हिंदी चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय गायक अभिजित यांनी महात्मा गांधी हे भारताचे नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते असं वक्तव्य केलं आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचं मोठं योगदान होतं. त्यांना देशाने राष्ट्रपिता ही पदवी दिली आहे. त्यांना आजही राष्ट्रपिता महात्मा गांधी असंच म्हटलं जातं. मात्र अभिजित भट्टाचार्य यांनी महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते असं म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
काय म्हणाले अभिजित भट्टाचार्य?
शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, ‘संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. महात्मा गांधी जसे राष्ट्रपिता होते, तसेच आर. डी. बर्मन हे संगीत विश्वाचे राष्ट्रपिता होते. इतकंच नाही तर अभिजीत यांनी महात्मा गांधींना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले. अभिजीत म्हणाले, महात्मा गांधी भारतासाठी नव्हते, ते पाकिस्तानसाठी होते. भारत आधीपासूनच भारत होता, पाकिस्तानची नव्याने निर्मिती झाली होती. महात्मा गांधी यांना चुकून भारताचे राष्ट्रपिता असे संबोधण्यात आले. पाकिस्तानचे निर्माता ते होते, वडील तेच होते, आजोबा ते होते, सर्व काही तेच होते.
अभिजित यांच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांच्या संताप
अभिजीत यांच्या या वक्तव्यावर अनेक यूजर्स संतापले. एकजण म्हणाला, ‘ते राष्ट्रपिता होते की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘त्याच्याकडून चांगल्या विधानांची अपेक्षा नाही. खुर्चीवर बसून हे लोक फालतू विधानं करत असतात. अभिजित भट्टाचार्य यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत. त्यांना आर. डी. बर्मन यांनी चित्रपटसृ्ष्टीत आणलं. अभिजित यांनी पहिलं गाणं हे बंगाली चित्रपटासाठी आशा भोसलेंसह म्हटलं होतं. सुरुवातीच्या काळात ते आर. डी. बर्मन यांच्यासह स्टेज शो करायचे. या आठवणीही त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या.
शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याबाबत काय म्हणाले अभिजित?
याच मुलाखतीत अभिजित यांनी शाहरुख खानबाबत भाष्य केलं. शाहरुख खान एका निराळ्या क्लासचा माणूस आहे असं अभिजित म्हणाले. तर सलमान खान विषयी अभिजित म्हणाले की अजून सलमान त्या व्यक्तींच्या यादीत नाही ज्यांच्याबाबत मी चर्चा करतो. शाहरुख खानसह माझे मतभेद झाले होते. पण तो सगळा प्रोफेशनल किंवा कामाशी निगडीत असलेला भाग आहे. मी जुडवा सिनेमातलं टन टना टन हे गाणं म्हटलं आहे. पण त्यावेळी मला हे माहीत नव्हतं की हे गाणं मी सलमान खानसाठी गातो आहे. डेव्हिड धवन यांचा सिनेमा होता, त्यामुळे मला वाटलं की त्यात गोविंदा प्रमुख कलाकार असेल. असंही अभिजित म्हणाले. तसंच सलमान खानच्या मागे दुवा आहेत म्हणून तो वाटचाल करतो आहे. तर शाहरुख खान हा संपूर्ण व्यावसायिक माणूस आहे असंही अभिजित म्हणाले.