आयुष्यात पहिल्या गोष्टीला कायमच एक वेगळं स्थान असतं. पहिलं काम, पहिलं कौतुक, पहिली शाबासकी… तसाच आयुष्यातला पहिला पुरस्कार हा प्रत्येकासाठी खास असतो. एखाद्या कलाकारासाठी त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या पुरस्काराची बात जरा न्यारीच असते, कारण यामुळेच एखाद्या कलाकाराला त्याच्या कामाची पोचपावती मिळत असते आणि त्यामुळे कलाकार जोमाने आणखी काम करतो.

आयुष्यातल्या अशाच पहिल्या पुरस्काराबद्दल अभिनेता अभिनय बेर्डेने (Abhinay Berde) भाष्य केलं आहे. अभिनयने नुकतीच झी नाट्य गौरव या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी त्याला त्याच्या आयुष्यातील पहिल्या पुरस्काराबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ‘टेलिगप्पा’शी संवाद साधताना त्याने आयुष्यातील पहिला पुरस्कार हा झी गौरव असल्याचेच म्हटलं. याबद्दल अभिनय म्हणाला की, “मला पहिला पुरस्कार हा झी गौरवचाच मिळाला होता. झी गौरवचा लक्षवेधी चेहरा हा पुरस्कार मला मिळाला होता.”

यापुढे तो म्हणाला की, “माझा ‘ती सध्या काय करतेय’ हा चित्रपट आला होता, त्यासाठी मला तो मिळाला होता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, पुरस्कार मिळाला तेव्हा तो घ्यायला मी येऊ शकलो नाही, कारण मार्च महिन्यात तो सोहळा झाला होता आणि तेव्हा मी जेजुरीला शूटिंग करत होतो, त्यामुळे मला येता आलं नाही. पण, तिथे खंडोबांनी ऐकलं आणि मला पुरस्कार दिला, त्यामुळे जेजुरीला जाऊन मी पुरस्कार मिळावा म्हणून पाया पडलो होतो आणि पुरस्कार मिळाला.”

अभिनयचे ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू आहे आणि याच नाटकाच्या निमित्ताने झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या नाटकात त्याच्याबरोबर अभिनेत्री निर्मिती सावंत, मुग्धा गोडबोले मुख्य भूमिकेत आहेत.

अभिनय बेर्डे हा दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे. लक्ष्मीकांत यांनी महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मुलगा अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे.

दरम्यान, अभिनयच्या ‘ती सध्या काय करतेय’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. यामुळे अभिनयच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. यानंतर त्याने ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘बांबू’, ‘रंपाट’ आणि ‘बॉईज ४’ सारख्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.