अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या आगामी ‘दसवी’ या सिमेमाच्या शूटिंगला सुरुवात केलीय. या सिनेमाच्या सेटवरील अभिषेकचा एक फोटो समोर आलाय. अभिषेकने स्वत: इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ‘दसवी’ सिनेमातील एका सीनचा आहे.
अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोला त्याने “दसवी का दस दिन” असं कॅप्शन दिलंय. या फोटोत अभिषेक एका सिंहासनासारख्या खुर्चीवर राजेशाही थाटात बसल्याचं दिसून येतंय. तर काही लोकांनी पालखीप्रमाणे त्याची खुर्ची उचलली आहे. अभिषेकची पालखी काढण्यात आली असून त्याच्या आजुबाजूला काही लोक नाचत असल्याचं या फोटोत दिसतंय.
22 फेब्रुवारीला अभिषेक बच्चनने एक फोटो शेअर करत सिनेमाचं शूटिंग सुरु झाल्याचं सांगितलं होतं.तसंच या सिनेमात झळकणाऱ्या यामी गौतमी आणि निमरत कौरचा लूक याआधी रिलीज करण्यात आला आहे.
View this post on Instagram
या सिनेमात अभिषेक बच्चन एका दहावी नापास असलेल्या नेत्याची भूमिका साकारत आहे. गंगाराम चौधरी असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे. गंगाराम चौधरी हा एक भ्रष्ट आणि स्वार्थी राजकारणी आहे. जो पुढे मुख्यमंत्री पदाच्या गादीवर बसतो. ज्याला त्याच्या गुंडागर्दीमुळे जेलमध्ये जावं लागतं. मात्र काही कारणास्तव त्याच्यावर दहावीची परिक्षा देण्याची वेळ येते. जेलमध्येच तो आभ्यास सुरु करतो. त्याला काही अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो ज्यात त्याला शिक्षणाचं महत्व कळतं. एकंदर पॉलिटीकल ड्रामाच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला जाणार आहे. तुषार जलोटा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
येत्या काळात अभिषेक बच्चन ‘द बिग बुल’ आणि ‘बॉब बिस्वास’मध्ये या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.