अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या अमर प्रेमकथेवर आधारित चित्रपट घेऊन संजय लीला भन्साळी येत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन प्रमुख भूमिकेत असलीत अशा चर्चा होत्या आता या चित्रपटासाठी तापसी पन्नूचं नाव चर्चेत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून साहिर लुधियानवी यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याचं संजय लीला भन्साळी यांचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकलं नाही आता संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटावर देखील लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार तापसी पन्नूची निवड या चित्रपटासाठी भन्साळी यांनी केली आहे. ती कवयत्री अमृता प्रीतम यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

यापूर्वी साहिर यांच्या बायोपिकसाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोण या दोन अभिनेत्रींची नावं देखील चर्चेत होती. महिन्याभरापूर्वी ऐश्वर्याचं नाव अमृता प्रीतम यांच्या भूमिकेसाठी भन्साळी यांनी निश्चित केल्याचं म्हटलं जातं होतं. अभिषेक- ऐश्वर्या या जोडीनं ‘कुछ ना कहो’, ‘धुम २’, ‘रावण’, ‘सरकार राज’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केलं. मात्र गेल्या कित्येक वर्षांत जाहिराती सोडल्या तरी ही जोडी एकत्र दिसलीच नाही. ‘गुलाबजाम’ या चित्रपटात अभिषेक-ऐश्वर्या बच्चन एकत्र दिसणार होते. मात्र काही कारणानं या चित्रपटातून दोघांनी माघार घेतली. त्यामुळे साहिर यांच्या बायोपिकमध्ये या दोघांना पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक होते. मात्र यावेळीही चाहत्यांची निराशा झाली असून ऐश्वर्याऐवजी तापसीची वर्णी लागली आहे.

तापसी आणि अभिषेकनं ‘मनमर्झिया’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. पण तापसी आणि अभिषेकची जोडी मात्र प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

Story img Loader