चित्रपटसृष्टीत अपेक्षेप्रमाणे घडणार्‍या गोष्टीतच एखादी अनपेक्षित घडणारी गोष्ट जास्त सुखद धक्का देते. ‘दक्षणा फिल्म्स’च्या ‘आक्का'(१९९४) चित्रपटाबाबत नेमके तेच झाले. श्रीधर जोशी दिग्दर्शित या मराठी चित्रपटाची निर्मिती पहलाज निहलानी व दीपक सावंत यांनी केली, तेव्हाच या चित्रपटात अमिताभ व जया हे बच्चन दाम्पत्य असणार हे उघड झाले होतेच. कारण दीपक सावंत हे अनेक वर्षे अमिताभ बच्चनचे हुकमी मेकअप मन होत. त्यामुळेच बच्चन दाम्पत्यावर या चित्रपटात ‘तू जगती अधिपती, नमन तुला पहिले श्री गणपती’ हे भक्तीगीत आहे. गोरेगावच्या चित्रनगरीतील देवळात याचे चित्रीकरण झाले. त्या दिवसात ही खूपच मोठी बातमी होती.
चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होताच त्याच्या ध्वनिफित प्रकाशन सोहळ्यास हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणता स्टार येणार याचे विशेष कुतुहल निर्माण झाले. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीचा असा एखादा इव्हेंट होणे ही खूपच कौतुकास्पद गोष्ट होती. ‘आक्का’ चित्रपटातील अजय फणसेकर, प्रशांत दामले, सोनिया मुळ्ये इत्यादी एकेक करीत आले. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अनिल मोहिले देखील आले. आणि अशातच जया बच्चनसोबत अभिषेक आला आणि सर्वांच्याच नजरा उंचावल्या. एक तर तेव्हा तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता, तोपर्यंत तो कोणत्याच चित्रपटविषयक कार्यक्रमांना आला नव्हता. तो अभिनेता म्हणून याच क्षेत्रात येईल अशीही तोपर्यंत काहीच चिन्ह दिसत नव्हती. (२००० साली तो ‘रिफ्यूजी’व्दारे आला.) त्यामुळेच तर जया बच्चन व अभिषेक असे चित्रपट कार्यक्रमास (तेही मराठी) एकत्र येणे खूपच मोठी गोष्ट ठरली. फोटोत त्याचे केवढे तरी घरेलुपण दिसतयं बघा. जयाच्याच हस्ते ‘आक्का’च्या गाण्याच्या ध्वनिफितीचे प्रकाशन झाले. पण बातमीत मात्र अभिषेक चमकला. दीपक सावंतला तसे सांगतच तत्क्षणी बाहेर पडलो.
दिलीप ठाकूर

Story img Loader