बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने २००० मध्ये जेपी दत्ता यांच्या रिफ्यूजी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे करिना कपूरचाही हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. अभिषेक बच्चनने सिनेसृष्टीत पाऊल ठेवून २० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. यादरम्यान त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. तर त्याचे काही चित्रपट हे फ्लॉपही ठरले.
चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अनेकदा अभिषेकला ट्रोल करण्यात आले. सध्या अभिषेक बच्चन हा बॉब बिस्वास या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अभिषेकने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या सिनेसृष्टीच्या पदार्पणाच्या काळाबद्दल सांगितले आहे.
नुकतंच अभिषेकने ‘रोलिंग स्टोन्स इंडिया’ या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी त्याला सिनेसृष्टीच्या संघर्षाबद्दल विचारण्यात आले. यावर तो भावूक होत म्हणाला, “मला माझा पहिला चित्रपट मिळवण्यासाठी २ वर्षे लागली. मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे तर २४ तास लोक माझ्यासाठी रांगेत उभे असतील, असे अनेकांना वाटते. पण तसे अजिबात नव्हते. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी मी प्रत्येक दिग्दर्शकाशी जाऊन बोललो. पण त्यातील एकानेही माझ्यासोबत काम करण्यास होकार दिला नाही.”
“माझे वडील अमिताभ बच्चन यांनी कधीही माझ्यासाठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच कोणालाही त्यांनी माझ्यासोबत चित्रपट करा, असेही कधी सांगितले नाही. मी काम करताना एका अभिनेत्याच्या चांगली बाजू पाहिली आहे आणि बेरोजगार अभिनेत्याची बाजूही बघितली आहे. पण तुम्ही कोणत्याही गोष्टी वैयक्तिकरित्या घेऊ शकत नाही. शेवटी तो एक व्यवसाय आहे. जर तुमचे चित्रपट चांगले चालले नाहीत, तर कोणीही तुमच्यासोबत दुसरा चित्रपट करण्यासाठी पैसे खर्च करणार नाही,” असेही ते म्हणाले.
“घराणेशाहीबद्दल होणारी चर्चा फार सोयीस्कररित्या केली जाते. काही गोष्टी आपण विसरलो आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. या २१ वर्षात खूप हृदयद्रावक घटना घडल्या. खूप वेदना झाल्या. ते सोपे नव्हते,” असेही त्याने सांगितले.
अभिषेक बच्चनच्या संघर्षाची कहाणी आणि त्याची मुलाखत ऐकून अमिताभ बच्चन यांनीही ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली आहे. “जीवनात संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही. मला तुझ्या संघर्षाचा अभिमान आहे. मला खूप आनंद झाला आहे. आजोबांचे शब्द आणि आशीर्वाद, पिढ्यानपिढ्या आम्हाला साथ देत आहेत. सदैव हीच शिकवण आहे,” असे अमिताभ बच्चन म्हणाले.