आतापर्यंत अनेक चित्रपटांत आणि मालिकांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा मिलिंद शिंदे लवकरच एक नाटक तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. राजकारणावर आधारित असलेल्या अबीर गुलाल या नाटकाचे लेखन स्वतः मिलिंद याने केले असून, तो यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्यासह पल्लवी वाघ यांचीदेखील नाटकात प्रमुख भूमिका असेल.
याविषयी मिलिंद म्हणाला की, आपल्या अस्तित्वासाठी कोणत्याही थराला जाणा-या व्यक्तिंवर आधारित असे हे नाटक आहे. फक्त मलाच सर्व काही मिळायला हवं, अशी विचारधारणा असलेल्या व्यक्तिरेखा यात पाहायला मिळतील. राजकारण्यांची मनमानी वृत्ती आणि त्यावर सामान्य माणसाची असलेली केवळ बघ्याची भूमिका यावर हे नाटक भाष्य करते. जसंजसं नाटक पुढे जात तसं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी यात पाहायला मिळतील. मी यात संभाजी पाटील या राजकारण्याची भूमिका साकारलीयं. या नाटकात पल्लवी वाघ माझी प्रतिस्पर्धी असणाऱ्या विद्या पाटीलची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
या नाटकाची कथा कशी सुचली असे विचारले असता मिलिंद म्हणाला, सकाळी उठल्यापासून अगदी मॉर्निंग वॉकला जरी गेलो तरी राजकारणावर बोलताना अनेकजण दिसतात. गेल्या वर्षभरापासून आपल्याकडे निवडणुका आणि विविध मुद्द्यांवरून अनेक राजकीय बदल वेगाने घडत आहेत. रंगभूमीवरही सध्या गंभीर, विनोदी नाटके मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळत आहेत. पण राजकारण हा विषय सहसा कोणी हाताळलेला नाही. तसेच, राजकारण हा माझा आवडीचा विषय असल्यामुळे त्यावर माझी लिहिण्याची इच्छा होती आणि त्यातून ‘अबीर गुलाल’ची कथा आकारास आली.
मंगेश सातपुते दिग्दर्शित आणि तृप्ती प्रॉडक्शनची निर्मिती असलेले ‘अबीर गुलाल’ ६ नोव्हेंबरपासून नाट्यगृहात पाहावयास मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा