चिन्मय पाटणकर
विद्या प्राधिकरणाच्या अखत्यारितील राज्य दृक श्रवण शिक्षण विभागाच्या संग्रहात असलेले अत्यंत दुर्मीळ आणि अनोखे दोन ‘चित्रदीप’ (मॅजिक लँटर्न-प्रोजेक्टर) उजेडात आले आहेत. अमेरिकन बनावटीचे हे चित्रदीप सुमारे १०० वर्षे जुने असल्याचा प्राथमिक अंदाज असून, आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय त्यांचे जतन करणार आहे.
राज्य दृक श्रवण विभागाच्या संग्रहात अनेक दुर्मीळ चित्रफिती होत्या. त्यात शैक्षणिक लघुपट, अनुबोधपट यांचा समावेश होता. त्या सोबतच हे चित्रदीपही होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने चित्रफितींच्या जतनासाठीची कार्यवाही सुरू केल्यावर हे चित्रदीप हाती आले. चित्रफीत दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. पेट्रोमॅक्स बत्तीसारखी बांधणी असलेल्या या चित्रदीपामध्ये चित्रफिती टाकून हाताने फिरवून दाखवण्याची सुविधा आहे. या चित्रदीपाच्या सहाय्याने दिवे नसलेल्या ठिकाणीही चित्रफिती दाखवणे शक्य व्हायचे. अमेरिकन बनावटीचे हे चित्रदीप १०० वर्षे जुने असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांवर अमेरिकन ऑप्टिकल कंपनी, बफेलो, न्यूयॉर्क अशी पट्टी लावलेली आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
‘संस्थेकडील दुर्मीळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे गेल्यामुळे त्याचे योग्य पद्धतीने जतन होईल याचा आनंद वाटतो,’ असे विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी सांगितले. संग्रहालयाचे चित्रपट जतन अधिकारी किरण धिवार म्हणाले, ‘आतापर्यंत भारतात अशा पद्धतीचा चित्रदीप पाहण्यात आलेला नाही किंवा तशी नोंदही आढळत नाही. ‘सिनेमॅटिक हेरिटेज’च्या दृष्टीने चित्रदीपचे महत्त्व मोठे आहे.’
१८९५मधील मॅजिक लँटर्न उपलब्ध
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे कल्याणच्या पटवर्धन यांनी १८९५ च्या सुमारास तयार केलेला ‘शांबरिक खरोलिका’ (मॅजिक लँटर्न) आहे. १९७५ च्या सुमारास तो संग्रहालयाकडे आला. आता नव्याने उजेडात आलेल्या या अनोख्या आणि दुर्मीळ चित्रदीपांविषयी अधिक माहिती शोधणे, त्याविषयीच्या जाणकार व्यक्ती शोधण्यावर भर आहे. हे चित्रदीप वापरात आणणे शक्य आहे का, याचा प्रयत्न केला जाईल. त्याचे अनोखेपण जपण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जातील. या दुर्मीळ चित्रदीपाच्या रुपाने संग्रहालयात बहुमूल्य भर पडल्याचा आनंद असल्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी म्हटले आहे.
मॅजिक लँटर्न म्हणजे काय?
पडद्याावर हलती चित्रे दाखवण्याचा प्रयोग १८व्या शतकात सुरू झाला. कंदिलासमोर चित्रे रंगवलेल्या काचेच्या पट्टया ठेवून भिंगातून त्याचे प्रक्षेपण समोर ठेवलेल्या पडद्यावर केले जायचे. पट्ट्या वेगाने सरकवून ही चित्रे हलत असल्याचा आभास निर्माण करण्याच्या या प्रयोगाला ‘मॅजिक लँटर्न’ नावाने ओळखले जाते.