विवाहाविषयी का विचारता? विवाहाचा विचारही मी केलेला नाही, अशी कसलेल्या राजकारण्यासारखी उत्तरे देणाऱ्या कतरिनाने याच ओघात ‘रणबीरचे माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे.’ अशी कबुली देत रसिकांचीच फिरकी घेतली. ‘कॉफी विथ करन’च्या सेटवर करीना कपूरने जाहीरपणे रणबीर आणि कतरिनामधील नात्याची कल्पना दिल्यानंतर या दोघांसाठीही प्रेमाचा लंपडाव खेळत राहणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. याआधी स्पेनमधील इबिझा बीचवरील या दोघांच्या एकत्र फिरण्याचा गाजावाजा झाल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांना सामोरे जाताना रणबीरला आपल्या प्रेमाची छुपी कबुली द्यावी लागली होती. कतरिना आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे, हे त्याला सांगावे लागलेच होते. आता क रणच्या शोनंतर कतरिनाचाही इतका पिच्छा पुरवला गेला की तिनेही रणबीरचे माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे स्थान आहे, असे सांगत प्रेमाची कबुली दिली आहे.
मला माझ्या विवाहाविषयी सतत का विचारले जात आहे? माझ्या विवाहाच्या योजना सोडा, तसा साधा विचारही मी केलेला नाही. आणि करणच्या शोमध्ये करीनाने जे म्हटले ते आपल्या भावाची गंमत करताना चेष्टेने म्हटलेले आहे. करीनाच कशाला रणबीरही शोमध्ये प्रेमाबद्दल किंवा विवाहाबद्दल काही बोललेला नाही. तरीही तुम्ही असे प्रश्न मला का विचारता?, असा उलट पवित्रा घेतला आहे. मुळात, इबिझा प्रकरणानंतर सावध झालेली कतरिना या विषयावर फारच कमी बोलते आणि तेही एकेक शब्द काळजीपूर्वक उच्चारते. रणबीरवर तुझे प्रेम आहे का?, असे विचारल्यावर मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असे तिने सांगितले. मी काहीही बोलले की मग त्याच्यावरून तर्कवितर्क  लढवले जाणार. त्यापेक्षा मी काहीही बोलणार नाही, असे सांगून ती मोकळी झाली.
 मात्र, माझ्या आयुष्यात जे लोक आहेत किंवा ज्यांच्याबरोबर मी फिरते त्यांचे माझ्यावर प्रेम असेलच ना.. नाहीतर ते कशाला असतील माझ्याबरोबर? तसे नसले तर ती माझ्यासाठी फारच दु:खाची गोष्ट आहे, अशी गोलमाल उत्तरे देणाऱ्या कतरिनाने फिरवून फिरवून का होईना रणबीरचे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे, असे आडवळणाचे उत्तर देत प्रेमाची कबुली दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा