एखादा कलाकार विनोदी भूमिकेत प्रेक्षकांना आवडायला लागला की साहजिकच त्याच्या वाट्याला येणाऱ्या भूमिकांमध्ये विनोदी चित्रपटांचंच प्रमाण अधिक असतं. अशा वेळी त्याच त्याच बाजाच्या विनोदी भूमिकांमध्ये अडकण्याची भीती असते. ‘टाइमपास’चा दगडू म्हणून घराघरात लोकप्रिय ठरलेल्या अभिनेता प्रथमेश परबच्या मते विनोदाच्या नावाखाली काहीही करून घेतलं जातं. त्यामुळे चित्रपटाची निवड करताना पटकथेतील वेगळेपणा शोधण्याचा आपला प्रयत्न असतो, असं प्रथमेशने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितलं.
या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रथमेशचा ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्याचा ‘होय महाराजा’ हा शैलेश एल. एस. शेट्टी दिग्दर्शित चित्रपट ३१ मेला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बऱ्याच कालावधीनंतर अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौगुले यांसारख्या मातब्बर विनोदी कलाकारांबरोबर प्रथमेशने एकत्र काम केलं आहे. त्यामुळे विनोदी अभिनयाची मस्त धमाल जुगलबंदी या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. ‘होय महाराजा’ या चित्रपटात कोकणातून आलेल्या एका तरुणाची कथा आहे. मालवणमध्ये कॉम्प्युटरचा डिप्लोमा पूर्ण करून त्या जोरावर सहज मुंबईत नोकरी मिळेल, या विश्वासाने हा तरुण मुंबईत येतो. मोठ्या पदाची नोकरी मिळेल, असं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाला प्रत्यक्षात शिपायाची नोकरी मिळते. घरच्यांपासून ही गोष्ट लपवत नोकरी करणारा, पैसे कमावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाला पैसे कमावण्याची एक नामी कल्पना सुचते. मामाच्या मदतीने ती कल्पना तो प्रत्यक्षातही उतरवतो, मात्र आणखी पैसे हवे या लोभापायी हा त्याचा खेळ वाढतच जातो, असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे. हा विषय आपल्याकडच्या लाखो तरुणांच्या जिव्हाळ्याचा आणि प्रत्यक्ष अनुभवाचा आहे आणि तो विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला असल्याने प्रेक्षक या चित्रपटाशी सहज जोडले जातील असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचंही त्याने सांगितलं.
हेही वाचा >>>Video: मराठी अभिनेत्रीच्या आजीला ‘गुलाबी साडी’ गाण्याची पडली भुरळ; नटून-थटून केला भन्नाट डान्स
ओढूनताणून विनोद करण्यापेक्षा प्रासंगिक विनोदांवर या चित्रपटाच्या पटकथेत अधिक भर दिला गेला आहे. शिवाय, इतके चांगले विनोदी कलाकार एकत्र आल्याने प्रत्येकानेच आपापल्या परीने विनोदाच्या जागा काढायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एक वेगळीच विनोदबुद्धी या चित्रपटातून अनुभवायला मिळेल, असं त्याने सांगितलं. या चित्रपटाच्या शेवटच्या दृश्याचं चित्रीकरण सुरू असताना हे सगळे अनुभवी विनोदी कलाकार एका रांगेत खुर्चीवर बसले होते. त्यांना एकत्र पाहणं हेही माझ्यासारख्या कलाकाराला भारी वाटून गेलं, असं तो म्हणतो.
नाटकासाठी वेळ मिळत नाही…
एकांकिकेतूनच पुढे अभिनय क्षेत्रात आलेल्या प्रथमेशसाठी रंगभूमीवर मिळणारं अभिनयाचं प्रशिक्षण तितकंच महत्त्वाचं आहे. रंगभूमीवर काम करताना तुमच्यातील कलाकार सातत्याने घडत जातो, बहरत जातो, असं तो सांगतो. मात्र नाटक तुमच्या अंगात भिनायचं तर त्यासाठी पुरेसा वेळही द्यावा लागतो. तिथे तुम्हाला वेळ घालवून चालत नाही, असं सांगतानाच सध्या एकापाठोपाठ एक चित्रीकरण सुरू असल्याने इच्छा असूनही नाटक करण्यासाठी वेळ देता येत नाही आहे, अशी खंतही त्याने व्यक्त केली.
हेही वाचा >>>‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची झाली फसवणूक, संतप्त विदिशाने पोस्ट करत कलाकारांना केली ‘ही’ विनंती
हिंदी किंवा मराठीतही चित्रपटाची निवड करताना पटकथा किती चांगली आहे? त्यात आपल्या व्यक्तिरेखेचं महत्त्व किती आहे? या सगळ्याचा विचार करत असल्याचं प्रथमेश सांगतो. पटकथेत व्यक्तिरेखा आणि गोष्ट चांगली लिहिली असेल तर कलाकाराला त्यात आपल्या अभिनयातून भर घालता येते. म्हणून हिंदीतही नुसतंच काम करायचं नाही, त्या ताकदीची किमान लक्ष वेधून घेण्याजोगी भूमिका असायला हवी, यावर भर देत असल्याचंही त्याने सांगितलं. सध्या त्याच्या ‘मुंबई लोकल’ आणि ‘१७६०’ या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. हातात असलेल्या चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात घेत पुढची वाटचाल सुरू राहील, असं तो ठामपणे सांगतो.
‘हिंदीत संयमाची कसोटी लागते’
प्रथमेशने ‘दृश्यम’सारख्या हिंदी चित्रपटातून काम केलं आहे. त्याने ‘ताजा खबर’ या वेबमालिकेत केलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. हिंदी चित्रपट वा वेबमालिकांमधून केलेलं काम खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. हा तिथे काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे, मात्र तिथे काम करताना संयमाची कसोटी लागते, असं प्रथमेश म्हणतो. ‘हिंदी चित्रपट वा वेब मालिकांना निर्मितीखर्च अधिक मिळतो. त्यामुळे तिथे वेळ घेऊन काम केलं जातं. त्यांचं चित्रीकरणावरचं प्रेमही अफाट आहे. मराठीत मात्र खर्च संयमानेच करावा लागत असल्याने सलग २० – २५ दिवसांत चित्रीकरण करून काम संपवावं लागतं. मराठीत आपण दिवसाला ४ ते ५ दृश्यं चित्रित करतो, तर हिंदीत एखाददोन दृश्यं पूर्णपणे चित्रित होतात, मात्र तुम्हाला वेळही तितकाच द्यावा लागतो. कधी तुमचं चित्रीकरण नसलं तरी इतरांचं काय चाललं आहे हे सेटवर थांबून पाहावं लागतं. तुमच्या दृश्याची पूर्वतयारी करावी लागते. त्यामुळे हिंदीत आपली व्यक्तिरेखा इतक्या दिवसांसाठी अचूक पकडून ठेवणं हे एक आव्हान असतं’ असे अनुभवही त्याने सांगितले.
आत्तापर्यंत जे यश मिळालं त्याचं अप्रूप वाटत नाही. आपण जे काम करतो आहोत ते प्रेक्षकांना आवडतं आहे. अभिनय तुम्ही नाटकातून करा वा चित्रपटातून करा… संपूर्ण यशस्वी असं इथे कोणी नसतं. तुमच्या कामात अचूकता आणण्याचा प्रयत्न तुम्हाला सतत करत राहावा लागतो. तुम्ही तुमच्या भूमिकेशी प्रामाणिक राहून सातत्याने काम करत राहिलात तर तुमच्या कामातून तुम्ही ओळख निर्माण करू शकता, यावर आपला विश्वास आहे. आणि त्याच पद्धतीने आपली आजवरची वाटचाल झाली आहे.- प्रथमेश परब