हृतिक रोशन पारंपारिक लोकप्रिय चित्रपटांतील नसिरुद्दीन शहा आहे, असे ‘कहो ना…प्यार है’ च्या वेळी (म्हणजे २०००साली) मुलाखतीसाठी भेटलो असतानाचे झालेले मत आजही कायम ठेवावे असा नुकताच प्रत्यय आला….
‘क्रिश ३’ हा त्याचा नवा चित्रपट दिवाळीचे आकर्षण ठरत असून त्यानिमित्तानेच त्याच्या जुहू येथील प्रशस्त निवासस्थानी ही नियोजित भेट झाली. आजही त्याला शुध्द हिंदी बोलताना काहीसे कष्ट पडतात हे प्रकर्षाने लक्षात आले. पण त्याचे मुद्दे स्पष्ट होते व आपल्या कामाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन कमालीचा सकारात्मक वाटला. त्याबाबत तो नसिरुद्दीन शाहसारखा वाटतो.
त्याच्या बोलण्यातील काही गोष्टी अशा, ‘क्रिश ३’ निर्माण करायचा की नाही यावरच आम्ही बराच काळ चर्चा केली, मी मात्र आपण हे निर्मितीचे आव्हान स्वीकारावे या मताचा होतो. डॅडी (अर्थात दिग्दर्शक राकेश रोशन) काही गोष्टींबाबत साशंक होते. आमच्या चित्रपटाच्या लेखकाचा संचदेखील काही नवीन सुचते का याचा विचार करीत होते. अखेर चार-पाच महिन्याच्या सातत्याच्या बैठकीनंतर काही गोष्टी आकाराला आल्या. ‘क्रिश ३’ पेक्षा एक छोटासा प्रेमपट निर्माण करावा असे एकदा आमच्या चर्चेतदेखिल आले. पण त्यामुळे ‘क्रिश ३’ सारखा निर्मितीचा थरारक अनुभव घेता आला नसता. मूळ कल्पनेपेक्षाही या चित्रपटाच्या निर्मितीत आम्ही सगळ्यांनी बरेच काही अनुभवले. मग ते क्रिशच्या रुपासाठी तब्बल तीन तास देणे असो अथवा रोमांचक दृश्यासाठीचे साहस असो. प्रत्येक पावलावर आव्हान होते. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे केवळ निर्मिती नव्हे तर तो एक अनुभव ठरला.
चित्रपटात माझी तिहेरी भूमिका आहे. रोहित, कृष्णा व क्रिश अशा त्या असून कृष्णा साकारणे मला थोडे अवघड गेले. खर तर त्या भूमिकेत करण्यासारखे विशेष असे काहीही नाही. रोहित व क्रिशच्या भूमिकांसाठी मला खूप विचार करावा लागे, त्या भूमिकेत शिरावे लागे, मला कायम अशा पध्दतीनेच काम करायला आवडते. बुध्दीचा वापर न करता कोणतीही गोष्ट करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे तुमच्यातील चांगले ते बाहेर पडत नाही. कृष्णाच्या भूमिकेचा विचार करताना त्यातही काही आव्हानात्मक आहे का याचा शोध घेतला. तेव्हा कुठे मी त्या भूमिकेवर लक्ष देऊ शकलो.
मध्यंतरी माझ्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा क्षणभर मी हादरुनच गेलो होतो. पण, ‘गुजारिश’मधील अभिनयाचा अनुभव मला तत्क्षणी उपयोगी पडला. जगात किती तरी विकलांग, अपंग माणसे जगण्याची जिद्द सोडत नाहीत, ते तशाही अवस्थेत आपले जगणे कायम ठेवतात. अशा माणसांपासूनच प्रेरणा घ्यायची असते.
मी ‘क्रिश ३’साठी घेतलेल्या मेहनतीचे रसिकांकडून कसे बरे स्वागत होत आहे याकडे माझे लक्ष्य आहे. ‘क्रिश ३’ हा आपल्याकडचा शंभर टक्के सुपर हिरोचा चित्रपट आहे. हॉलीवूडचे बॅटमॅन, सुपरमॅन इ. बरेचसे सुपरहिरोंचे चित्रपट हिंदीत ‘डब’ होऊन प्रदर्शित झाल्याने आपल्याकडच्या प्रेक्षकांना अशा प्रकारच्या चित्रपटांची सवय झाली आहे. त्यातच आता त्यांना आणखी चांगले पाहण्याची इच्छा असेलच….
हृतिक रोशन तद्दन फिल्मी नाही असा त्याच्या बोलण्यातून प्रत्यय येतो. हीच त्याची वृत्ती त्याची भूमिका खुलवण्यात उपयोगी पडत असावी… हृतिक रोशनच्या भेटीतला असा आनंद त्याच्या भेटीची ओढ वाढवतो. पण तो तर मोजक्याच चित्रपटातून भूमिका साकारतो.