हिंदी चित्रपट वा मालिकांमध्ये काम करणं ही मराठमोळय़ा लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओकसाठी नवीन गोष्ट नाही. अन्विता दत्तच्या ‘कला’पासून ते अ‍ॅटलीचा ‘जवान’, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ अशा विविधांगी आशय-विषयावरील चित्रपटांत चोखंदळ भूमिकांमधून समोर आलेल्या गिरिजावर सध्या प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षांव होतो आहे. ‘जवान’च्या निमित्ताने दिग्दर्शक अ‍ॅटलीची शैली, शाहरुख खानचा प्रेमळ स्वभाव आणि आगामी चित्रपटाविषयी तिने ‘लोकसत्ता’शी भरभरून गप्पा मारल्या.  मराठी चित्रपट म्हणजे घरी आल्यासारखं आहे. त्यामुळे घरात तरी सशक्त भूमिका करण्याचे लाड पुरवून घ्यायची इच्छा आहे, अशी भावना गिरीजाने यावेळी व्यक्त केली.

मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून गिरिजाने केलेल्या भूमिका या काहीशा वैचारिक-सकस आशय असलेल्या आहेत, त्यामुळे ‘जवान’सारख्या पैसावसूल मनोरंजक चित्रपटाचा भाग व्हावंसं का वाटलं? याविषयी बोलताना एका भव्य चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया जवळून अनुभवता येणं हा  यातला औत्सुक्याचा भाग होता, असं तिने सांगितलं. ‘अ‍ॅक्शन, व्हीएफएक्सचा सढळ वापर असलेला इतका मोठा चित्रपट करतानाची प्रक्रिया, त्यातल्या तांत्रिक बाबी समजून घेणं किती जणांना शक्य होतं? ‘जवान’ चित्रपटात मला स्वत: अ‍ॅक्शन दृश्यं द्यायची होती, त्यामुळे कोणाकडून ऐकण्यापेक्षा त्या प्रक्रियेचा भाग होत ते शिकण्याचा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. चित्रीकरण करत असताना तुम्हाला कथा माहिती असते, काय होतं आहे चित्रपटात हे माहिती असतं; पण पूर्ण संकलित झाल्यानंतर चित्रपट आपल्यासमोर येतो तेव्हा त्याचा प्रभाव निश्चितच वेगळा वाटतो आणि तो अनुभव मी या चित्रपटाच्या निमित्ताने घेतला,’ असं गिरिजाने सांगितलं.

‘जवान’चा दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या चित्रीकरण शैलीविषयीही ती भरभरून बोलते. ‘आत्तापर्यंत मला ज्या पद्धतीच्या चित्रीकरण शैलीची सवय होती, त्यापेक्षा पूर्ण भिन्न पद्धतीचं अ‍ॅटलीचं दिग्दर्शन आहे. साधारणपणे एखादा सीन वाचल्यानंतर तो काय पद्धतीने चित्रित होणार आहे? हे लक्षात येतं. सेटवर गेल्यावर अशा प्रकारे शॉट घेतला जाईल, अमुक क्लोजअप असेल असा थोडा अधिक अंदाज कलाकाराला येतो. या गोष्टी दिग्दर्शक म्हणून अ‍ॅटलीच्या नियोजनात असायच्याच, मात्र त्यापलीकडे खूप वेगळय़ा जागा काढायची त्याने तयारी केलेली असायची. कित्येकदा दृश्यं चित्रित झाली की, तो त्याच्या मोबाइलमध्ये असलेल्या एखाद्या पार्श्वसंगीताची धून ऐकत त्याच्या सुरावटीवर ते दृश्य कसं वाटतं आहे हे पाहून ते बरोबर झालं आहे की नाही हे ठरवायचा. तो चित्रपटाचं संगीत, प्रकाशयोजना, दृश्याची मांडणी या सगळय़ावर खूप काम करतो. एका पद्धतीने कथा पुढे नेताना प्रेक्षकांना नेहमीच्या दृश्यातही काही तरी हटके जाणवावं अशा जागा तो निर्माण करतो. मग ती संवादातून वा अ‍ॅक्शन दृश्यातून किंवा अनेकदा प्रसंगातून येते. समोरच्याला अनपेक्षित असा प्रवेश, काही तरी असा क्षण रचणं ज्यावर हमखास टाळय़ा-शिट्टय़ा मिळतील, ही त्याच्या दिग्दर्शनाची खासियत आहे. तो त्याच्या कलेचा उस्ताद आहे’ अशा शब्दांत ती अ‍ॅटलीचं कौतुक करते.

या चित्रपटासाठी प्रीतीशील सिंगने अप्रतिम रंगभूषा केल्याचं गिरिजाने सांगितलं. ‘पुष्पा’पासून अनेक मोठमोठय़ा चित्रपटांसाठी रंगभूषा करणाऱ्या प्रीतीशीलला नुकताच ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटातले शाहरुखचे सगळे लुक्स तिने केलेले आहेत, तर आमच्या कपडय़ांची जबाबदारी अनिरुद्ध आणि दीपिका या खूप हुशार डिझायनर्सनी सांभाळली आहे. व्यवस्थित अभ्यास आणि अगदी कमीत कमी वेळेत म्हणजे एका रात्रीत डिझाईन करून तयार कपडे घेऊन ते आमच्यासमोर असायचे तेव्हा हे सगळं यांनी कधी केलं असेल याचं खूप नवल वाटायचं, अशी आठवणही गिरिजाने सांगितली.

अगदी अलीकडे केलेल्या चित्रपटांमागची भावनाही गिरीजाने मोकळेपणाने व्यक्त केली. विशेषत: अन्विता दत्तचा ‘कला’ चित्रपट केला तेव्हा स्त्री दिग्दर्शकाबरोबर काम करणं का महत्त्वाचं वाटतं हे तिने सांगितलं. ‘स्त्री जेव्हा चित्रपट लिहिते आणि दिग्दर्शित करते तेव्हा खूप वेगळं भावविश्व पडद्यावर पाहायला मिळतं. आपल्याकडे स्त्री लेखिका-दिग्दर्शिका खूप कमी आहेत. आता कुठे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा आवाज बुलंद होतो आहे. त्यामुळे स्त्री दिग्दर्शिकेच्या दृष्टिकोनातून तयार झालेल्या चित्रपटाचा भाग असावं असं वाटतं. मी मुळात अन्विता दत्त यांच्या चित्रपटांची चाहती आहे, त्यांचा ‘बुलबुल’ मला खूप आवडला होता. पहिल्याच भेटीत आमच्या दोघींमध्ये एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालं,’ असं गिरिजाने सांगितलं.

शाहरुखबरोबरची पहिली भेट

‘शाहरुख खान सेटवर यायच्या आधी दोन दिवस आम्ही चित्रीकरण सुरू केलं होतं. तो सेटवर येणार म्हणजे नेमकं काय होणार याची आम्हालाही उत्सुकता होती आणि तो सेटवर आला. त्याने आम्हाला प्रत्येकीला मिठी मारली. प्रत्येकीशी संवाद साधला. तुम्ही माझ्याबरोबर या चित्रपटाचा भाग आहात त्याबद्दल मी खूप आभारी आहे, असं म्हणत त्याने पहिल्याच भेटीत वातावरण मोकळं केलं. नंतरही तो आमच्याबरोबर मिळून मिसळून होता, आम्ही सेटवर एकत्रित गप्पा मारायचो. आमच्या प्रश्नांना उत्तरं देणं, किस्से सांगणं, अगदी काही दृश्यांमध्ये माझ्या वस्तू हातात देण्यापासून ते कसं उभं राहा म्हणजे कॅमेऱ्यात तुझी प्रतिमा येईल हे सगळं सांगण्यापासून प्रत्येक गोष्ट सेटवर त्याने प्रेमाने, आवडीने केली’ अशी आठवण सांगतानाच तो कमाल व्यक्ती असल्याची पावती तिने दिली. अगदी दोन दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या घरी झालेल्या भेटीचा किस्साही तिने सांगितला. या भेटीतही छोटं-मोठं कोणतंही काम असू दे, प्रेमाने आणि सातत्याने ते करत राहा. अडचणी येतील, पण त्यावर काही तरी मार्ग निघेलच, असा स्वानुभव सांगतानाच आज लोक आपल्या यशाचं कौतुक करत असले तरी माझ्याकडून चुकाही झाल्या, अपयशही आलं, ते कोणाला माहिती नाही हेही त्याने कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलं, असं ती म्हणते.

‘जिंदा बंदा’चे सहा दिवस..

‘जवान’ चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ हे गाणं सध्या खूप गाजतं आहे. ‘या गाण्यासाठी आम्ही सहा दिवस नाचत होतो. हाडं खिळखिळी होईपर्यंत आम्ही नाचलो. आमचा ५७ वर्षांचा नृत्य दिग्दर्शक रोज यायचा आणि सेटवर दणकून नाचून निघून जायचा. शाहरुखबरोबर या गाण्यावर नृत्य करायचं होतं. त्यालाही जेव्हा नृत्यातील काही स्टेप्स लक्षात यायच्या नाहीत तेव्हा तो आम्हाला विचारायचा. करून दाखवायला सांगायचा. प्रियामणी आणि त्याने याआधी ‘वन टु थ्री फोर’ या गाण्यावर एकत्र नृत्य केलं होतं, त्यामुळे तिच्याकडून तो शिकून घ्यायचा. वरती हेही सांगायचा की तेव्हापासून ती मला नाचायला शिकवायचा प्रयत्न करते आहे; पण मला अजून काही जमलेलं नाही,’ असं तिने सांगितलं.

मराठीत काम करताना घरी असल्याची भावना असते, म्हणून इथे थोडे लाड व्हावेसे वाटतात.  क्षितिज पटवर्धनने ‘दोन स्पेशल’ लिहिल्यानंतर ते वाचलं तेव्हा ही भूमिका मी सोडून कोणी करणार नाही, असं मी त्याला म्हटलं होतं. तशी उत्तम भूमिका, उत्तम संहिता, छान संच असला तर मला मराठी चित्रपट करायला आवडेल. – गिरिजा ओक