रेश्मा राईकवार
प्रत्येक नव्या चित्रपटाबरोबर आशय-विषयात प्रयोग करत राहणं ही दिग्दर्शक म्हणून आर. बाल्की यांची खासियत आहे. बाल्की अमुक एका शैलीचे चित्रपट अधिक करतात असंही म्हणण्याची सोय नाही हे त्यांचं वैशिष्टय़ पुन्हा एकदा ‘घूमर’च्या बाबतीत सिद्ध झालं आहे. म्हटलं तर क्रीडा नाटय़ प्रकारातला हा चित्रपट.. पण इथे खेळातल्या तांत्रिकतेपेक्षा तो खेळणाऱ्या व्यक्तींची कथा, त्यांचा संघर्ष केंद्रस्थानी आहे. अर्थात, प्रत्येक प्रयोग यशस्वीच ठरतो किंवा अचूक उतरतोच असं नाही. त्यामुळे ‘घूमर’चा हा बाल्की प्रयोग कलाकारांच्या अभिनयामुळे अधिक उठावदार झाला आहे हे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
‘घूमर’चं कथानक पूर्णत: काल्पनिक आहे. १९४८ साली एका हाताने पिस्तूल शूटिंग करत ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या हंगेरियन क्रीडापटू कैरोली टकास यांच्यावरून ‘घूमर’ची कथाकल्पना प्रेरित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. आपल्याला हा चित्रपट पाहताना ‘अनन्या’ या नाटकाची आणि चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण दोन्हीकडच्या नायिकांचा संघर्ष, एक अवयव गमावल्यानंतर आहे त्या प्रत्येक अवयवाचा उपयोग करून आपल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याची त्यांची जिद्द कथेच्या केंद्रस्थानी आहे. ‘घूमर’मध्ये फक्त नायिका अनायना दीक्षित या क्रिकेटपटूची ही गोष्ट नाही, तर तिला पुन्हा जिद्दीने उभं करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाचीही गोष्ट आहे. उत्तम फलंदाज होण्याचं स्वप्न उराशी बाळगून लहानपणापासून त्या ध्येयाचा पाठपुरावा करणारी अनायना या परिश्रमाच्या आणि गुणवत्तेच्या बळावर कमी वयात भारतीय महिला क्रिकेट संघात दाखल झाली आहे. इंग्लंडच्या ज्या दौऱ्यासाठी तिची निवड झाली आहे त्याच्या निवड प्रक्रिये दरम्यान तिच्या आयुष्यात पॅडी नावाचं एक वादळ प्रवेश करतं. पद्मनाभ सोधी नामक हा एकेकाळचा यशस्वी आणि दुर्दैवी गोलंदाज तिला तिच्या फलंदाजीवरून खरंखोटं सुनावतो काय.. आणि नेमकं त्याच क्षणी दौऱ्यावर निघण्याआधी एका अपघातात अनायनाला आपला उजवा हात गमवावा लागतो. प्रकाशमान होता होता अंधकारमय झालेल्या आपल्याच जगात अनायना हरवण्याआधी पुन्हा हाच पॅडी तिच्या आयुष्यात डेरेदाखल होतो. उत्तम फलंदाज ते एक हात गमावूनही केवळ डाव्या हाताने गोलंदाजी करत भारतीय महिला क्रिकेट संघात सन्मान मिळवणारी अनायना हा प्रवास म्हणजे ‘घूमर’ हा चित्रपट.
क्रिकेट या खेळावर आधारित हा चित्रपट असल्याने खेळातील तांत्रिकता उत्तम सांभाळणं हे ओघानं आलंच. ते काम आर. बाल्की यांनी चोख बजावलं आहे. अनायनाचं उत्तम फलंदाज असणं आणि गोलंदाज म्हणून नव्याने सुरूवात करताना शारीरिक तयारीपासून ते बॉल पकडणं, गोलंदाजी करतानाचा वेग, तंत्र टप्प्याटप्प्याने ती कसं शिकत जाते हा भाग खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर येतो. त्याच वेळी तिला प्रशिक्षण देणारा पॅडी हा उत्तम गोलंदाज आहे, मात्र अनायनाला गोलंदाजी शिकवताना तिचा एक हात नसल्याने येणाऱ्या शारीरिक अडचणी त्याच्या ध्यानी न येणं, एकदा ते लक्षात आल्यानंतर तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी नव्या तंत्राचा त्याने विचार करणं आणि केवळ शारीरिक नव्हे तर तिच्या मानसिक तयारीसाठीही कठोर पण वेगळय़ाप्रकारे विचार करणं हा या दोन व्यक्तिरेखांचा एकमेकांबरोबरचा प्रवास हा या चित्रपटातला सगळय़ात लक्ष वेधून घेणारा भाग आहे. त्यातही या दोघांची मानसिकता टोकाची वेगळी आहे. अनायना जिद्दी असली तरी तेवढीच हळवी आहे. तिला तिच्या घरच्यांची तिची आजी, वडील, भाऊ आणि प्रियकराचीही भक्कम साथ आहे. तर पॅडी पहिल्यापासूनच एकटा आहे. लिंगबदल करून स्त्री झालेली रसिका ही त्याची मानलेली बहीण हाच पॅडीचा आधार आहे. एक हात नसलेल्या अनायनाला गोलंदाज म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर केवळ तांत्रिकदृष्टय़ा उत्तम होणं हे पुरेसं नाही, तर जगाला नवल करायला लावेल अशी जादू, कौशल्य तिला कमवायला हवं. त्यासाठी तिला कठोर व्हायला हवं हे पॅडीचं त्याच्या आयुष्यात आलेल्या कठोर अनुभवातून आलेलं शहाणपण. त्यामुळे तो तिला अत्यंत कठोरतेने वागवतो. आर. बाल्की यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून केलेली या दोन प्रमुख व्यक्तिरेखांची वेगळी मांडणी आणि त्यासाठी केलेल्या कलाकारांची निवड या जमेच्या गोष्टी ठरल्या आहेत. अभिनेता अभिषेक बच्चनने पॅडीच्या देहबोलीपासून ते संवादफेक सगळय़ाच बाबतीत एक वेगळाच सूर पकडला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा खडूस प्रशिक्षक ही नवी गोष्ट नसली तरी त्याचा पॅडी लक्ष वेधून घेतो. सैय्यामी खेरने अनायनाच्या पात्रात जान आणली आहे. तिचं एकंदरीत व्यक्तिमत्त्व आणि तिचा अभिनय, खेळ सगळं उत्तम जमून आलं आहे. शबाना आझमी, अंगद बेदी, शेवटच्या काही दृश्यांत समालोचकाच्या भूमिकेत अवतरलेले अमिताभ बच्चन, मराठमोळा अभिनेता संदेश कुलकर्णी सगळेच उत्तम कलाकार चित्रपटात आहेत.
इतके चांगले कलाकार, व्यक्तिरेखा असतानाही चित्रपट प्रामुख्याने या दोन व्यक्तिरेखांभोवतीच फिरत राहतो. त्या नादात कुठेतरी अपघातानंतरची अनायनाची मानसिकता, आपला एक हात नाही या वास्तवाचा तिने केलेला स्वीकार या गोष्टी झटपट पुढे जातात. अनायनाच्या आजीला असलेलं खेळाचं वेड आणि हुशारी सतत दिसत राहते, पण त्यामागची गोष्ट कळत नाही.
पॅडी आणि रसिका यांच्यातला घट्ट बंधही चटकन लक्षात येत नाही. ज्या सहजतेने अनायनाचा क्रीडा समितीकडून स्वीकार केला जातो तोही पचनी न पडणारा आहे आणि कथेच्या शेवटाला दिलेलं वळणही विनाकारण वाटतं. कथानकात दुर्लक्षित राहिलेल्या किंबहुना काहीशा सोप्या केलेल्या या गोष्टींमुळे या चित्रपटाचा प्रभाव कमी झाला असला तरी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ‘घूमर’ कमाल ठरतो.
घूमर
दिग्दर्शक – आर. बाल्की
कलाकार – सैय्यामी खेर, अभिषेक बच्चन, शबाना आझमी, अंगद बेदी.