रेश्मा राईकवार
एका मोठय़ा कलाकाराचं अल्पशा विश्रांतीनंतर होणारं पुनरागमन कसं असावं? याचे आडाखे बांधणं हे आजच्या काळात तसं महाकठीण. तो पिटातल्या प्रेक्षकांच्या टाळय़ा-शिटय़ा मिळवणारा बॉलीवूडचा यशस्वी तारांकित कलाकार असेल तर त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांची एक वेगळीच प्रतिमा त्याला घट्ट चिकटून बसलेली असते. अशा वेळी आपली आधीची ओळख पूर्णपणे पुसून टाकून नव्याने अॅक्शन हिरो म्हणून स्वत:ला पडद्यावर अजमावण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते याची प्रचीती बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘पठाण’ पाहताना येते. प्रेमपटांचा नायक म्हणून लोकप्रिय असलेल्या शाहरूखने या चित्रपटात प्र..प्र.. प्रेम दूरच ठेवलं आहे. त्यामुळे लुकपासून देहबोलीपर्यंत त्याचा पुरेपूर अॅक्शन अवतार पाहायला मिळणं हे या चित्रपटाचं मोठं वैशिष्टय़ आहे.
शाहरूख खानचं पुनरागमन आणि ॲक्शन हिरो म्हणून त्याचं पुनरुज्जीवीकरण या दोन गोष्टी डोळय़ासमोर ठेवून यशराज प्रॉडक्शनने अगदी ठाकून ठोकून ‘पठाण’चा घाट घातला आहे आणि त्यामुळेच यशराजच्या या ‘गुप्तहेरपट’ मालिकेतील चौथ्या चित्रपटाची धुरा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याच्या हातात देण्यात आली आहे. ॲक्शनपटासाठी सिद्धार्थचा हात धरत यशाची पहिली चव अभिनेता हृतिक रोशनने चाखली होती. ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ या दोन्ही चित्रपटांतून हृतिकला त्याची ॲक्शन हिरोची प्रतिमा पुन्हा मिळाली. त्यामुळे सलमान खानच्या ‘टायगर’ चित्रपटश्रृंखलेला यश मिळवून देणाऱ्या कबीर खान आणि अली अब्बास जफर या दोन्ही दिग्दर्शकांना बाजूला सारत यशराजने ‘वॉर’ला तिकीटबारीवर यश मिळवून देणाऱ्या सिद्धार्थ आनंदच्या हातात ‘पठाण’ दिला. सिद्धार्थच्या आजवरच्या चित्रपटांची शैली पाहता अॅक्शनपटाला साजेसं वेगवान कथानक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे रचना केलेले स्टंट्स, ॲक्शनदृश्यं ही त्याची खासियत आहे. भावनिक नाटय़ात दिग्दर्शक म्हणून तो गुंतून पडत नाही, परिणामी ‘पठाण’मध्येही अॅक्शन एके ॲक्शनच पाहायला मिळते. नाही म्हणायला पठाणची बॉस नंदिनीच्या भूमिकेतील डिंपल कपाडिया यांच्यावर देशभक्ती जागवणारा एक मोठा भावनिक प्रसंग चित्रित झाला आहे, मात्र त्यातील भावना अश्रूंवाटे बाहेर पडायच्या आत दिग्दर्शक नायकाला कर्तव्यपूर्तीसाठी पळवतो. त्यामुळे भावनिक नाटय़ाला पूर्णपणे फाटा दिलेला हा चित्रपट ॲक्शनदृश्यांसाठीच पाहावा.
‘पठाण’ची कथा ही इतर ॲक्शनपटांप्रमाणेच देशहितविरोधी कारवायांविरोधात लढणारा नायक अशीच आहे. इथे नायकाला मिशनपुरती का होईना काश्मीरचं ३७० कलम हटवल्यामुळे डोकं सटकलेला पाकिस्तानी जनरल आणि त्याने आऊटफिट एक्स नामक कोणा दहशतवादी संघटनेला हाताशी धरून केलेल्या कारवाया देण्यात आल्या आहेत. कथेला आजच्या काळातील घटनांचे ताजे संदर्भ देण्याची हुशारी लेखकांनी इतपतच मर्यादित ठेवलेली नाही. कोविडपेक्षाही भयंकर अशा व्हायरसचा इथे शोध लावला गेला आहे. यातून पठाण आपल्याला कसं बाहेर काढतो ही सुफळ संपूर्ण कथा पडद्यावर पाहणं इष्ट ठरेल. शाहरूख खान या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे, त्यामुळे त्याच्यावरचं प्रेक्षकांचं लक्ष कुठेही हटणार नाही आणि तो त्याच्या खास शैली राखूनही अॅक्शन हिरो म्हणून वेगळा कसा दिसेल, याची काळजी दिग्दर्शकाने मांडणीत घेतली आहे. त्याच्या मांडणीत खरे उतरण्यासाठी देहयष्टीपासून देहबोलीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर शाहरूखने मेहनत घेतली आहे. नेहमीपेक्षा काहीसा खर्जातील आवाज शाहरूखने पकडला आहे. त्यामुळे पठाण म्हणून तो प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. अर्थात या वेळी त्याला नाही म्हटलं तरी खलनायकी भूमिकेतला जॉन अब्राहम सगळय़ाच अगदी अभिनयाच्या बाबतीतही भारी पडला आहे यात शंका नाही. जॉनचा लुकही या चित्रपटात अत्यंत वेगळा आहे. त्याचा जिम पाहताना ‘धूम’मधली त्याची खलनायकी भूमिका आठवल्याशिवाय राहात नाही. दीपिका पदुकोणने आयएसआय एजंट रुबाईच्या भूमिकेत पुरेपूर उतरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही मोजक्या ॲक्शनदृश्यांशिवाय तिच्या वाटय़ाला फार काही आलेलं नाही. त्या तुलनेत डिंपल कपाडिया मात्र नंदिनीच्या भूमिकेत भाव खाऊन जातात.
मोजक्याच पण चांगल्या कलाकारांचा दमदार अभिनय ‘पठाण’ची कथा कितीही पोकळ असली तरी चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची क्षमता टिकवून ठेवतो.
गुप्तहेरपटांची श्रृंखला आणि त्यासाठी सलमानच्या टायगर प्रवेशाची जोड याही दोन्ही गोष्टी चित्रपटात जमून आल्या आहेत. ‘बेशरम रंग’ हे पहिलंच गाणं प्रेक्षकांना धरून ठेवतं आणि ते भगव्या बिकिनीतील दीपिकासह संपूर्ण पाहिल्यानंतरही कशासाठी होता विरोधाचा अट्टहास.. हे आकळत नाही. चित्रपटात इन-मीन दोन गाणी आहेत. त्यातलं ‘झुमे जो पठान’ हे गाणं शेवटाला येत असल्याने डोक्याला फारसा ताप होत नाही. बाकी पठाण आणि त्याचा खलनायक जिम या दोघांच्या प्रवेशासाठी आणि एकूणच चित्रपटातील अॅक्शनदृश्याला साजेल असं उत्तम पार्श्वसंगीत संचित आणि अंकित बलहारा बंधूंनी दिलं आहे. पुरेपूर पैसा वसूल ॲक्शनपट देण्याचं आणि ‘पठाण’ नावाने शाहरूखला ॲक्शन हिरो म्हणून उभं करण्याचं आव्हान दिग्दर्शकाने यशस्वीपणे पेललं आहे. त्यासाठीच हा चित्रपट पाहायला हवा. बाकी साठीला पोहोचलेले शाहरूख आणि सलमान याही वयात आपलं स्टारडम का बाळगून आहेत याची एक झलक या चित्रपटात पाहायला मिळते. मात्र त्यासाठी प्रेक्षकांनी गाणं सुरू होताच चित्रपट संपला म्हणून उठून जायची घाई करू नये. बाकी ‘माव्र्हल’पटांमुळे शेवटपर्यंत पुढे काय हे पाहण्यासाठी खुर्ची टिकवून ठेवणाऱ्या सुज्ञ प्रेक्षकांस आणखी काही सांगणे न लगे..
पठाण
दिग्दर्शक – सिद्धार्थ आनंद
कलाकार -शाहरूख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा आणि (पाहुणा) सलमान खान</p>