‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांसह अनेक समीक्षक कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेता आमिर खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अत्यंत कमी बजेटमध्ये निर्मिती झालेला या चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे अनेकजण कौतुक करत असताना बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मात्र यावर मौन बाळगले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने हा चित्रपट पाहिल्यानतंर बॉलिवूडवर निशाणा साधला होता. त्यानतंर आता आमिर खानने याबाबत भाष्य केले आहे.
नुकतंच आमिर खानने त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी एका पत्रकार परिषदेदरम्यान आमिर खानला ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिला का? चित्रपट कसा वाटला? असे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तो म्हणाला, “मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही. पण मी असे ऐकलं आहे की हा एक अतिशय चांगला आणि यशस्वी चित्रपट आहे. यासाठी मी या चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन करतो.”
दरम्यान ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील इंतेझार हुसेन सईद नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मुस्लिम समुदायाबद्दल चुकीचे चित्र दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात घडलेल्या संपूर्ण घटनेबद्दल एकतर्फी भाष्य केले जात आहे. यामुळे हिंसाचार होण्याची शक्यता आहे, असे या याचिकेत म्हटले होते.
मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे विवेक अग्निहोत्रींना दिलासा मिळाला होता.