– अद्वैत दादरकर, अभिनेता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी रुपारेल महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि इतिहास या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केलं. रुपारेल खरेतर मी टाळत होतो, कारण माझा मोठा भाऊ  पण त्याच कॉलेजमध्ये पदवी शिक्षण पूर्ण करीत होता. तो तिकडे आहे म्हटल्यावर मला कॉलेज लाइफ एन्जॉय करता येणार नाही, असा समज. अशा नाना समस्यांनी भंडावून गेलेला मी शेवटी रुपारेलमध्येच प्रवेशकर्ता झालो. रुपारेलचा कॅम्पस माझ्यासाठी आकर्षणाचा विषय होता.

अकरावीला असताना माझा झोनच वेगळा होता. दीपक राजाध्यक्ष हा त्या वेळी एकांकिका दिग्दर्शित करायचा. माझ्या मोठय़ा भावाने मला तंबी दिली होती की नाटय़विश्वात रमायचं नाही. त्यामुळे गुपचूप अभ्यास करायचा त्यामुळे अकरावीत मी केवळ विद्यार्थी आणि नाटय़प्रेक्षक ही भूमिका बजावली. मी बारावीला गेल्यावर माझा भाऊ  ‘पासआऊट’ झाला होता. त्यामुळे प्रियदर्शन जाधव आणि दीपक राजाध्यक्ष या दोघांच्या आग्रहाने मी नाटय़विभागात एकदाचा गेलो. या विभागाचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. मी अतिशय दंगादेखील इथे केलाय. ज्यामुळे मला वेळोवेळी शिक्षाही झालीय. त्याचं झालं असं, ‘शीतयुद्ध सदानंद’ या एकांकिकेची तालीम सुरू होती. एका ‘रनथ्रो’मध्ये आम्हा मित्रांना एका प्रसंगामुळे खूप हसू आलं म्हणून आम्ही हसलो तेव्हा दिग्दर्शक प्रचंड संतापला आणि त्याने आम्हाला कॅण्टीनमध्ये ओणवं उभं राहण्याची शिक्षा दिली. या प्रसंगामुळे इतर मुलं आमच्यावर हसू लागले.

बारावीला असताना मी ‘झेप’ नावाची एकांकिका केली. या एकांकिकेमुळे माझी रंगभूमीवरचं पाऊस यशस्वी ठरलं. कारण त्या वर्षीच्या मृगजळ, सवाई आणि आयएनटी या सर्व स्पर्धा आम्ही जिंकलो. त्यामुळे दुसऱ्या वर्षी ‘एफवाय’ला असताना सर्वच ठिकाणांहून आमच्यासाठी अपेक्षा वाढल्या. पण काही केल्या त्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य नव्हतं. ‘एसवाय’ला असताना मात्र प्रियदर्शन जाधवने बसवलेली ‘त्या तिथे पलीकडे’ या एकांकिकेने पुन्हा चांगले दिवस आम्हाला दाखवले. ‘टीवाय’ला आग्य्राहून सुटका ही एकांकिकाही आयएनटी, मृगजळ अशा मानाच्या स्पर्धेत सर्वप्रथम ठरली. नाव जरी ऐतिहासिक असलं तरी याचा विषय वेगळा होता. आग्रा ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशाची ही हटके गोष्ट होती. ‘टीवाय’ पूर्ण झाल्यावर मी दिग्दर्शकाची भूमिका कॉलेजमध्ये बजावू लागलो. त्या वर्षी मी ‘काळोख’ नावाची एकांकिका बसवली होती. जी प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरली.

ट्री ११ नावाच्या झाडाखाली मी बऱ्याचदा बसायचो. कोण्या एकेकाळी ११ जण तिकडे एकत्र बसायचे म्हणून त्या जागेला तसं नाव पडलं होतं. हॉस्टेलजवळ एक झाड होतं आणि त्या झाडाच्या पाराला ‘हम्टी-डम्टी’ हे नाव पडलं होतं. त्या जागेवर कॉलेजमधले ‘लव्हबर्ड्स’ बसायचे. माझ्या वेळी रुपारेलमध्ये ट्रॅडिशनल डे म्हणजे आमच्यासाठी सणच. अकरावीचं वर्ष वगळता उरलेल्या चार वर्षांत मी प्रचंड अवलीगिरी ‘ट्रॅडिशनल डे’ला केली. एक वर्ष आम्ही कॅण्टीनमध्ये दोन जोडप्यांचं गमतीत वैदिक पद्धतीने लग्न लावलं. एक वर्ष आम्ही सर्व मुलांनी साडय़ा तर मुलींनी झब्बे घातले होते आणि धमाल केली होती. यात संपूर्ण कॉलेजमध्ये कुठेही अलिप्तता जाणवणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेतली होती. दरवर्षी क्रीडांगणावर क्रिकेटचे सामने आयोजित करायलाही मी अग्रेसर असायचो.

कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षांला असताना ‘स्टुडण्ट कौन्सिल’ या विभागात नाटय़दर्पणच्या मुलांनी कल्चरल सेक्रेटरीपदासाठी मला पुढे ढकलायला सुरुवात केली. नाटय़दर्पणचा फायदा होणार असेल तर मग का नाही, या आशेने मीही पुढे आलो. मग प्राचार्याच्या पुढय़ात माझं नाव पुढे करणे वगैरे अनेक प्रकार घडू लागले. या विभागात अतिशय घाणेरडं राजकारण चालतंय हे माझ्या लक्षात येऊ  लागलं. क्षितिज नावाच्या महोत्सवातून पैसे काढणे हाच यांचा मुख्य उद्देश होता. हे माझ्या कालांतराने लक्षात आलं. मी कल्चरल नाही पण आर्ट्स सेक्रेटरी झालो. या विभागाच्या सभेत मी इथे इतर मुलांना नकोय हे माझ्या लक्षात येऊ  लागलं. आणि कॉलेजमध्ये चालणारं अतिशय घाणेरडं राजकारण मी जवळून अनुभवलं. म्हणजे तिथे जातपात पण काढली जायची.

नाटय़विभागात हा मुलगा या रोलसाठी उत्तम आहे का, इतकंच बघितलं जायचं. जातपातीचा लवलेशही तिथे नव्हता. नाटय़विभागाच्या मोकळ्या वातावरणातून गढूळ वातावरणात रमायला मला काही जमलं नाही. मुळात राजकारण कशाशी खातात हेच मला माहीत नसल्याने मला ते प्रकार बघवले जात नव्हते. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना आलेल्या या अनुभवानंतर मी उभ्या आयुष्यात कोणत्याही राजकारणाच्या वाऱ्याला उभा राहिलो नाही, अशी मनातल्या मनात शपथच घेतली.

रुपारेलमध्ये असताना मी कॉलेज कॅण्टीनमध्ये आणि कॉलेजच्या बाहेर भरपूर खवय्येगिरी केली आहे. आमच्या कॅण्टीनमध्ये व्हेज, नॉनव्हेज दोन्ही मिळत. सोबत हॉस्टेलची मेसही आमचे लाड करायची. कॅण्टीनमध्ये धोंडू आणि सिंबा नामक आचारी होते. जे अतिशय स्वादिष्ट पदार्थ बनवायचे. शिवाजी पार्कची टीप्सची फ्रँकी, गेटवे ऑफ इंडियाची बगदादी बिर्याणी, वांद्रेची हर्ष बेकरी, दादर स्टेशनवरचा चॉकलेट टी, वरळी सागर सेतूची कॉफी, रमाझन ईदच्या दरम्यान मोहम्मद अली रोडवरील खाबूगिरी आजही माझ्या लक्षात आहे माझ्यासाठी कॉलेजचा शेवटचा दिवस म्हणजे आमचे प्राचार्य कुलकर्णी सर हे जेव्हा सेवानिवृत्त झाले तो दिवस होय. कारण त्यांच्यानंतर नाटय़विभागाला उतरती कळा लागली. रुपारेलने मला दिग्दर्शक असल्याची दृष्टी दिली.

शब्दांकन : मितेश जोशी

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor adwait dadarkar talk about his day in ruparel college zws
Show comments