बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या बिग बी हे ‘कौन बनेगा करोडपती १४’मुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली होती. यानंतर ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी सर्व चाहते प्रार्थना करत होते. नुकतंच त्यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांना २३ ऑगस्टला करोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. “नुकतीच माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी.” असे आवाहन त्यांनी त्यांच्या ट्वीटद्वारे केले होते. त्यानंतर आता त्यांनी स्वत: करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

आणखी वाचा : आणखी वाचा : “काही गोष्टी करायच्यात पण…” अमिताभ बच्चन यांची बॉयकॉट ट्रेंडवर पहिली प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन हे नेहमीच विविध विषयांवर ब्लॉग लिहित असतात. नुकतंच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, “अखेर कामावर परतलो. माझी करोना चाचणी काल रात्री नेगिटिव्ह आली. तुमच्या प्रार्थनांसाठी खरंच खूप खूप आभार. आयसोलेशनचे ते ९ दिवस संपले.” त्यांच्या या पोस्टद्वारे त्यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : Amitabh Bachchan Corona Positive: अमिताभ बच्चन यांना पुन्हा करोनाची लागण, ट्वीट करत बिग बी म्हणाले…

दरम्यान बिग बींना करोनाची लागण झाल्यानंतर कौन बनेगा करोडपतीचे शूटींग थांबवण्यात आले होते. आता त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा केबीसीचे शूटींग सुरु केले आहे. केबीसीच्या टीममधील खास सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आमची टीम सतत बिग बींच्या संपर्कात होती. गेल्या आठवड्यातील भाग आधीच चित्रीत असल्याने आम्हाला कोणावरही फारसा ताण आला नाही. ते सात दिवस क्वारंटाईन होते.

आम्ही त्यांच्या नेगिटिव्ह चाचणीची वाट पाहत होतो. ते झाल्यावर लगेचच आम्ही पुन्हा एकदा चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे देखील पुन्हा एकदा केबीसीच्या मंचावर येण्यासाठी उत्सुक आहेत, असेही केबीसीच्या टीममधील लोकांनी सांगितले.