सध्या महाराष्ट्रभर नृत्यांगना गौतमी पाटीलचं नाव गाजत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये तर गौतमीची प्रचंड क्रेझ आहे. तिच्या कार्यक्रमांना तर तुफान गर्दी पाहायला मिळते. अगदी कमी कालावधीमध्ये गौतमीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण तितकीच तिच्यावर टीकाही करण्यात आली. काही जण तिच्या कार्यक्रमांना विरोध करत आहेत. अशामध्येच गौतमीचं खरं आडनाव पाटील नाही. तिने पाटील आडनाव लावू नये असा नवा वाद सुरू झाल आहे. यावर आता अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गौतमीच्या पाटील आडनावावरुन सुरु असलेल्य वादावर अनेक राजकीय मंडळींनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. तर अमोल कोल्हे यांनी तिला पाठिंबा दिला आहे. गौतमीच्या कलेचा आदर समाजाने केला पाहिजे तसेच यशाच्या शिखरावर गौतमी असताना तिला समाजाने पाठिंबा दिला पाहिजे असं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे.
‘टिव्ही९ मराठी’शी संवाद साधताना अमोल कोल्हे म्हणाले, “लावणी नृत्यांगणा म्हणून आज गौतमी पाटील यांची प्रचंड क्रेझ आहे. कलाक्षेत्रामध्ये यश हे कायम कलाकाराबरोबर नसतं. प्रत्येक कलाकाराला याचा सामना करावा लागतो. आज गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. त्यामुळे मी सगळ्यांना एकच सांगतो की, कलाकार म्हणून त्या त्यांची कला सादर करत आहेत. तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यापेक्षा कलाकाराची कुचंबना होऊ नये असं मला वाटतं”.
“गौतमी पाटील यांचं वय अजूनही खूप लहान आहे. त्यामुळे मिळालेलं यश पचवणं फार अवघड असतं. यश पचवण्यासाठी समाजाने त्यांना मदत करायला हवी. त्यांच्या अदांवर ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात फिदा आहेत. त्यांच्या कार्यक्रमांनाही प्रचंड गर्दी होत आहे. यामध्ये कोणतेही विषय आणून विरोध करु नये. मी काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेली मुलाखत पाहिली. ज्यावेळी त्यांची हालाखीची परिस्थिती होती त्यावेळी आता ट्रोल करणारे गौतमी पाटील यांना दोन वेळेचं अन्न द्यायला जात नव्हते. आज जर हिच महिला तिच्या कतृत्त्वाच्या, कलेच्या जोरावर पुढे जात आहे तर कोणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण?” अमोल कोल्हे गौतमीच्या कलेचा पूर्णपणे आदर करतात.