अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचं काल निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. फुफ्फुसांच्या कर्करोगाशी ते लढत होते. गेल्या एका महिन्यापासून त्यांची तब्येत स्थिर नव्हती. त्यांना गेल्या आठवड्यात बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
या रुग्णालयात दाखल केल्यावर तिथेच त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. त्यानंतर शनिवारी त्यांना घरी आणण्यात आलं, अशी माहिती त्यांची मुलगी प्राची मोघे यांनी दिली. रविवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. “गेल्या महिन्याभरापासून त्यांची तब्येत स्थिर नव्हती. सतत तब्येतीत बिघाड होत होता. त्यामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांच्या शेवटच्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला असल्याचं निदान करण्यात आलं”, असं प्राची पीटीआयशी बोलताना म्हणाल्या.
मोघे हे त्यांच्या मिमिक्री कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. अभिनेते संजीव कुमार यांच्या ‘शोले’ चित्रपटातल्या ठाकूर या पात्राची उत्तम मिमिक्री करत असत. मोघे यांचं हे पात्र प्रचंड गाजलं होतं आणि काही मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी हे पात्र साकारलं होतं. सचिन पिळगांवकर यांचं निवेदन असलेल्या ‘एक दो तीन’ या कार्यक्रमातही ते सहभागी होते. सौदागर, चुपके चुपके, गुप्त या आणि अशा बॉलिवूड चित्रपटांचं विडंबन यात केलं जायचं.
अभिनेता सलमान खानसोबत त्यांनी ‘मैने प्यार क्यों किया’, ‘पार्टनर’ अशा चित्रपटांतही काम केलं आहे. तर राजकुमार संतोषी यांच्या ‘दामिनी’ तसंच ‘घातक’ या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.