अभिनेते किरण माने हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. बिग बॉस या मराठीतल्या त्यांच्या सहभागामुळे ते चांगलेच लोकप्रिय झाले. स्पष्ट आणि बेधडक बोलण्याची त्यांची सवय आहे. अनेकदा ते विविध पोस्टही करतात. त्यामुळे ते चर्चेत राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांना एका मालिकेतूनही काढून टाकलं होतं. त्याबाबतही त्यांनी नुकतंच भाष्य केलं. आता त्यांनी ब्राह्मण्यवादावर गौतम बुद्धांनी कसा विजय मिळवला ते सांगितलं आहे.
मालिकेतून काढण्यात आल्याची गुपितं बरीच
“तुम्हाला एका मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं त्याविषयी काय सांगाल?” याविषयी विचारलं असता किरण माने म्हणाले, “त्यावेळची खूप गुपितं आहेत मी सगळीच आता सांगू शकत नाही. पण, वेळ आली की यावर जरुर बोलेन. यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ५ जानेवारीला मी एक पोस्ट लिहिली होती. आम्ही कलाकार समोर फक्त एक प्रेक्षक जरी असला तरी प्रयोग करतो. पण, त्यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान एका सभेसाठी पंजाबमध्ये गेले होते आणि तिथे प्रेक्षक कमी आहेत म्हणून ते माघारी फिरले होते. माझ्या पोस्टची त्याच्याशी लिंक लावून मला प्रेक्षकांनी खूप ट्रोल केलं. ” असं किरण माने गेल्या महिन्यात म्हणाले होते. आता त्यांनी नवी पोस्ट चर्चेत आहे.
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
..आपल्याकडं दडपशाहीविरोधात, जुल्मी राजसत्तेच्या वर्चस्ववादाविरोधात अनेक पक्ष उभे रहातात. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. पण ध्येय एकच असते, हुकूमशाही संपवणे. अकेला शेर आणि गिदडांच्या झुंडीफिंडी असले काही नसते. अराजकाचा विषारी साप ठेचण्यासाठी प्रत्येकानं आपलं तंत्र ठरवलेलं असतं. हे प्राचीन काळापासून होत आलेलं आहे.
बुद्धांच्या काळातही वैदिक ब्राह्मणांच्या हजार वर्षांच्या वर्चस्वाला संपवण्यासाठी आपल्या भूमीवर मोठे बौद्धिक आंदोलन सुरू होते. वेद,पुराण,ब्राह्मणग्रंथांमधील विचारधारेला विरोध करणार्या बुद्धांबरोबरच बासष्ट विचारवंतांच्या दार्शनिक विचारधारा होत्या. त्यापैकी काही विचारधारा महत्त्वाच्या मानल्या जात होत्या.
एक विचारधारा काश्यप याची होती
यातली एक विचारधारा काश्यप याची होती. ‘अक्रियावादी’ विचार. म्हणजेच ‘आत्म्यावर कोणत्याही कर्माचा प्रभाव पडत नाही’ हा विचार ! काहीही करा… कोणाची हत्या करा, चोरी, दरोडा, व्यभिचार… कशाचंही पाप आत्म्याला लागत नाही-पुण्यही नाही. यालाच समांतर पकुध काच्वायन याचा ‘अन्योन्यवाद’ होता. मानवाची उत्पत्ती सात तत्त्वांपासून झाली. या तत्त्वांचा कशानेही नाश होत नाही, कोणी एखाद्याचं शीर धडावेगळं केलं म्हणून त्याची हत्या होत नाही. शस्त्र सात तत्वांना भेद करून गेलं. एवढंच घडतं. बुद्धांना हे मान्य नव्हते. ते म्हणाले “या दोन्ही विचारधारांनी माणूस पाप करायला घाबरणारच नाही. कोणीही कोणाचीही हत्या करेल.”
अजित केशकम्बल याचा ‘उच्छेदवाद’ होता. यज्ञ, होम हे निरर्थक आहे. कर्माची फळं, स्वर्ग, नरक असले काही नसते. जगात जे काही दुःख आहे, कष्ट आहेत, त्यातून काहीही केले तरी आत्म्याची सुटका नाही. ते भोगावेच लागतात. मक्खली घोषांचा ‘नियतीवाद’ही होता… “होना है वो होता हे. होनी को कोई टाल नहीं सकता’ टाईप.
बुद्ध काय म्हणत?
बुद्ध म्हणत, “असं मानलं तर माणसाला खाणं-पिणं-मजा करणं याशिवाय दुसरं कामच नाही असं वाटेल… आणि तो स्वत:लाही आणि कुटुंबालाही दु:खाच्या गर्तेत नेईल.”
गौतम बुद्ध जेव्हा ब्राह्मण्यवादाविरोधात नव्या प्रकाशाच्या शोधात होते तेव्हा महावीर हयात होते. त्यांनी ‘चातुर्यामसंवरवाद’ सांगीतला. महावीरांच्या मते आत्म्याला मागच्या जन्मीच्या पापकर्मामुळे पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसानं पापकर्मापासून मुक्तीसाठी तपश्चर्या केली पाहिजे. ब्रह्मचर्याचे पालन. चातुर्याम धर्माचे पालन करायला सांगीतले. हिंसा न करणे, चोरी न करणे, मिथ्यावचन न करणे आणि अपरिग्रह म्हणजे संपत्ती किंवा कशाचाही लोभापोटी संचय न करणे.
बुद्ध म्हणाले, “बाकी योग्य आहे पण आयुष्यभर संन्यास, तपश्चर्या करत जगणं आणि ब्रह्मचर्य, वैराग्य हे माणसाला अशक्य आहे. त्याच्या इच्छा आणि स्वाभाविक प्रवृत्तीनुसार जगण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखं आहे.” मग बुद्धांनी बहुजनांच्या उद्धारासाठी स्वतंत्रपणे नव्या प्रकाशाचा शोध घेतला… जो रॅशनल होता. लॉजिकल होता. जगण्यासाठी प्रेरणा देणारा होता. म्हणून तो प्रचंड लोकप्रिय आणि यशस्वी झाला…आणि ब्राह्मण्यवादावर धम्माने नेत्रदीपक विजय मिळवला !
बहुजन हिताय… बहुजन सुखाय.
किरण माने
अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे. किरण मानेंच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. आता याबाबत आणखी काही प्रतिक्रिया दिल्या जाणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.