Ashok Saraf Birthday Special : मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीचे अभिनेते अशोक सराफ यांचा आज ७५वा वाढदिवस. अशोक मामा म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख आहे. आज वाढदिवसानिमित्त अशोक मामांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोणी अशोक मामा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत आहे तर कोणी त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं हे सांगत आहे. अभिनेता भरत जाधवने देखील अशोक सराफ यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत असताना पहिल्या वहिल्या चित्रपटामध्ये भरत जाधवला अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अशोक सराफ यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करताना म्हटलं आहे. की, “एखाद्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करायचं असेल तर फक्त एका प्रश्नाचं उत्तर शोधावं की, ती व्यक्ती नसती तर..? अशोक सराफ यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीची कल्पनासुद्धा कोणी करू शकत नाही इतकं मोठं योगदान त्यांचं आहे. या कलासृष्टीमध्ये नाव कमवायला खूप जणं येतात पण एकेकाळी संपूर्ण मराठी सिनेइंडस्ट्री जगवणारा फक्त एखादाच अशोक सराफ असतो.”
आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्राजक्ता माळीला मिळाला निवांत वेळ, म्हणाली, “माझी काळजी नसावी लवकरच…”
पुढे बोलताना भरतने सांगितलं की, “मी स्वतःला भाग्यवान समजतो की अभिनेता म्हणून पदार्पण करत असताना पहिल्याच चित्रपटात अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुढेही अनेक चित्रपटातून आम्ही एकत्र काम केलं. अशोक सराफ यांच्या सारखी माणसं ही दिपस्तंभासारखी असतात. त्यांच्याकडे पाहतं राहावं. त्यांच्याकडून शिकत राहावं आणि आपली वाटचाल करत रहावी.”
आणखी वाचा – जबरदस्त प्रमोशन, देवदर्शन करुनही ‘सम्राट पृथ्वीराज’ला थंड प्रतिसाद, अक्षय कुमारच्या हाती निराशा
अशोक सराफ यांचं कौतुक करताना भरत म्हणतो, “अशोक मामा म्हणजे Man with The Midas Touch…त्यांनी ज्या ज्या भूमिकांना हात लावला त्याचं सोन झालं. अशा या अभिनयाच्या अनभिषिक्त सम्राटास व माणुस म्हणूनही ‘नवकोट नारायण’ असलेल्या प्रिय मामांना ७५ व्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.. आणि हे ७५ वय वगैरे इतरांसाठी त्यांच्या अफाट एनर्जी व उत्साहासमोर ते अगदीच ‘अतिसामान्य’ आहे. ‘साडे माडे तीन’, ‘लपून -छपून’, ‘चालू नवरा भोळी बायको’ अशा अनेक चित्रपटांमध्ये भरत जाधव आणि अशोक सराफ यांनी एकत्र काम केलं आहे.