Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ यांंना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा आज म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. अभिनेते अशोक यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या यादीत महाराष्ट्रातली इतरही महत्त्वाची नावं आहेत. अशोक सराफ यांचं विनोदाचं टायमिंग जबरदस्त आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विश्वांमध्ये वावरलेले आणि अजूनही आपलं टायमिंग साधत उत्तम विनोद करणारे अशोक सराफ हे एक हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यांच्या अशीही बनवा बनवी मधील धनंजय मानेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. विनोदाच्या परफेक्ट टायमिंगच्या या बादशहाला पद्मश्री पुरस्कार मिळणं ही कलासृष्टीसाठी अभिमानाचीच बाब आहे यात शंका नाही.
पांडू हवालदार मधून अशोक सराफ आले आणि..
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेलं. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली ‘माईलस्टोन’ भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका आहे. तसंच ‘पांडू हवालदार’ या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला. तसंच ‘राम राम गंगाराम’ या दोन चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांच्यासह त्यांनी भूमिका केल्या. त्या दोन सिनेमांमधला अभिनयही लोकांच्या लक्षात आहे.
अशोक सराफ यांचं सिनेसृष्टीतलं योगदान खूप मोठं
मागच्या वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं. या वर्षी जानेवारी महिना संपताना अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. तसंच सचिन, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अशी ही बनवा बनवी हा चित्रपट आजही लोकांना तेवढाच खळखळून हसवतो यात शंका नाही. धमाल बाबल्या गणप्याची, अफलातून, एका पेक्षा एक, धरलं तर चावतंय, चंगू-मंगू असे एकाहून एक सरस चित्रपट अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने महाराष्ट्राला हसवलं आहे. अजय देवगणच्या सिंघममधला निवृत्तीकडे झुकलेला अशोक सराफ यांनी साकारलेला हवालदारही लोकांच्या लक्षात आहे. उत्तम टायमिंग, मर्म विनोदातून लोकांना हसवणं आणि वेळेला डोळ्यांतून पाणी काढण्याचीही कला अशोक सराफ यांच्या अभिनयात आहे. कळत नकळत सिनेमात त्यांनी साकारलेला छोटू मामा त्यांच्या अभिनयाचा हळवा कोपरा दाखवून जातो. बहुरुपी सिनेमातली त्यांची भूमिका मनावर एक आघात करुन जाते. वजीर चित्रपटातला बाबासाहेब मोरे हा मुख्यमंत्री बेरकी राजकारणी कसा असावा ते दाखवून जातो. त्यामुळे अशोक सराफ यांचं नाव घेतल्याशिवाय मराठी सिनेसृष्टी अपूर्ण आहे यात शंकाच नाही. याच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रतल्या कुणाकुणाल पद्मश्री पुरस्कार
१) अशोक सराफ पद्मश्री
२) अश्विनी भिडे देशपांडे- शास्त्रीय गायिका पद्मश्री
३) जसपिंदर नरुला- गायिका- पद्मश्री
४) रानेंद्र भाऊ मजूमदार- बासरी वादक – पद्मश्री
५) सुभाष खेतुलाल शर्मा – पद्मश्री
६) वासुदेव कामत – ज्येष्ठ चित्रकार पद्मश्री
७) अच्युत पालव -सुलेखनकार पद्मश्री
८) अरुंधती भट्टाचार्य- बँकर- पद्मश्री
९) मारुती चितमपल्ली- पद्मश्री
१०) डॉ. विलास डांगरे- पद्मश्री
११) चैत्राम पवार-पद्मश्री