महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे धक्कादायक वक्‍तव्‍य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलंच राजकारण तापलं आहे. समाजाच्या विविध स्तरातून संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे.

राजकीय वर्तुळात तर यामुळे चांगलंच वातावरण तापलं आहे. कला क्षेत्रातीलही बऱ्याच लोकांनी या वक्तव्याची कठोर शब्दांत निंदा केली आहे. कवी आणि अभिनेते सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनीही फेसबुक पोस्टमधून याचा विरोध केला. आता या पाठोपाठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही नुकतीच शेअर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना…”, किशोर कदमांची पोस्ट; म्हणाले, “आता हा मुद्दा एकनाथ शिंदे…”

अतुल कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये महात्मा गांधींवर एक छोटीशी कविता अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या आवाजात सादर केली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, “एक संवेदनशील अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सध्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर रचलेल्या या ओळी मनाला खूप भावल्या… मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या अशा अनेक पिढ्या मेल्या पण ‘तो’ मेला नाही आणि मरणारही नाही.. ‘तो’ आहे #गांधीविचार आणि #महात्मागांधी!” असं म्हणत अतुल कुलकर्णी यांना त्यांनी टॅगही केलं आहे.

अतुल कुलकर्णी यांनी सादर केलेल्या कवितेतून गांधीजी यांचे विचार आणि त्यांच्या महानतेवर चिखल उडवणाऱ्या लोकांवर अत्यंत मार्मिकपणे टीका करण्यात आलेली नाही. गांधीजी यांच्या मरणावर ही कविता भाष्य करते. ही पोस्ट शेअर करताना अतुल कुलकर्णी यांनी काहीही लिहिलेलं नाही. एकूणच संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.

Story img Loader