नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून रूपेरी पडद्यावर अभिनय करणारे नंदू माधव, दीपाली सय्यद, हिंदी चित्रपटातील आयटम गर्ल आणि आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारी राखी सावंत आणि महेश मांजरेकर हे कलाकार आता राजकारणाच्या सारीपाटावर अभिनय करण्यासाठी सरसावले आहेत.
मराठी कलाकार आणि राजकारण हे समीकरण काही नवीन नाही. ही मंडळी कलाकार असली तरीही त्यांची वैचारिक बांधिलकी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी होती आणि यापुढेही ती कायम राहील. अर्थात कलाकारांच्या नव्या पिढीमध्ये अपवाद वगळता अनेक जण तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेणारे आहेत. त्यामुळे वैचारिक बांधिलकी न मानता आपले नाव आणि सध्याची प्रसिद्धी याचा जमेल तेवढा फायदा करून घेण्यासाठी दहीहंडी, नवरात्र, हळदीकुंकू किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सकाळी एका तर संध्याकाळी दुसऱ्या राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही जण ‘जो जास्त पैसे देईल त्याचा प्रचार आपण करू’ अशी ‘स(ई)ही’ वाटही चोखाळत आहेत. मराठी कलाकार आणि राजकीय पक्ष यांचा संबंध तसा जुना आहे. काही वर्षांपूर्वी शाहीर-लोककलावंतानी लोकसभा/विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार केला होताच. दादा कोंडके शिवसेनेच्या जवळचे. शिवसनेच्या अनेक प्रचार सभांमधून त्यांनी भाषणेही केली होती. मराठी कलाकार तर सध्या शिवसेना आणि महाराष्ट नवनिर्माण सेना यांच्याशी संबंधित असलेल्या चित्रपट शाखांमध्ये विभागले गेले आहेत.
गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मराठीतील काही कलाकारांनी शिवसेना आणि मनसेच्या प्रचार सभांना आपली हजेरी लावली होती. प्रचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नोंदविला होता. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी १९९६ मध्ये कोल्हापूर मतदार संघात शिवसेनेकडून तर आदेश बांदेकर यांनी २००९ मध्ये शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. दिवंगत अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांनीही काँग्रेसच्या तिकिटावर राजापूर येथून निवडणूक लढवून राजकारणाच्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न केला. चित्रपट निर्माते व अभिनेते शरद बनसोडे यांनीही ‘भाजप’कडून २००९ मध्ये सोलापूर येथून लोकसभा निवडणूकीचा सामना केला होता. मात्र या मराठी कलाकारांना निवडणूक आणि राजकारणाच्या वाटेवर यश मिळाले नाही. बॉलिवूडमध्ये वैजयंतीमाला, नर्गिस, हेमा मालिनी, जयाप्रदा, दीपिका चिखलिया, स्मृती इराणी, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, दिलीपकुमार, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, अरिवद द्विवेदी, राजबब्बर, नितीश भारद्वाज ते गोिवदा आदी कलाकारांनी प्रत्यक्ष लोकसभा निवडणूक लढवून किंवा राज्यसभेवर जाऊन राजकारणाच्या वाटेवर आपले नशीब अजमाविले. सुनील दत्त तर पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पण दाक्षिणात्य कलाकारांच्या तुलनेत बॉलिवूड किंवा मराठीतील कलाकार एकदमच फिके पडले. त्यांचा विशेष प्रभाव ना राजकारणात पडला ना सत्ता स्थापनेत. ते थेट राज्यकर्ते म्हणूनही कधी पुढे येऊ शकले नाहीत. उलट दक्षिणेतील रुपेरी पडदा गाजविलेले एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामाराव, एम. करुणानिधी, जयललिता यांनी अभिनयातून थेट राजकारणात उडी घेतली आणि ते राज्यकर्तेही झाले. खरे तर थेट राजकारणात न पडता किंवा कोणतीही निवडणूक न लढविता पण तरीही वेळोवेळी आपली राजकीय किंवा वैचारिक भूमिका जाहीररित्या ठामपणे व्यक्त करणे, सामाजिक आंदोलन, उपक्रम यात प्रत्यक्ष सहभागी होणे, त्याला पािठबा देणे, एखाद्या सामाजिक/ राजकीय प्रश्नावर प्रसार माध्यमातून आपली भूमिका रोखठोकपणे मांडणे, फारफार तर राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार सभेत उपस्थित राहणे किंवा भाषण करणे यापुरतचा मराठी कलाकारांचा राजकारणाशी संबंध राहिलेला आहे. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापुरकर, अमोल पालेकर, नाना पाटेकर, शरद पोंक्षे ही यापैकी काही ठळक उदाहरणे.
मात्र आता महेश मांजरेकर, नंदू माधव, दीपाली सय्यद, राखी सावंत हे प्रत्यक्ष निवडणूक लढविण्यासाठी राजकारणाच्या आखाडय़ात उतरले आहेत. त्यांचा हा प्रयत्न किती यशस्वी आणि अन्य मराठी कलाकरांना प्रोत्साहित करतो, हे येणारा मे महिना ठरवेल.
गुढी राजकारणाची: अभिनेता ते नेता
मराठी कलाकार आणि राजकारण हे समीकरण काही नवीन नाही. ही मंडळी कलाकार असली तरीही त्यांची वैचारिक बांधिलकी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी होती
आणखी वाचा
First published on: 30-03-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor become a leader