अभिषेक तेली, लोकसत्ता

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटांमधून ग्रामीण बाजाच्या कथा आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘रौंदळ’ या आगामी चित्रपटातून भाऊसाहेब एका सर्वसामान्य शेतकरी पुत्राच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Self Awareness and Self Acceptance are very important steps to succeed in any interview
पहिले पाऊल: मुलाखतीला सामोरे जाताना
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…

शेतकरी माल पिकवण्यासाठी व तो टिकवण्यासाठी वर्षभर मेहनत घेत असतो, परंतु पिकवलेली गोष्ट विकणे त्याच्या हातात नसते. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ही समस्या सातत्याने शेतकऱ्यांना भेडसावते आहे. या परिस्थितीचे प्रभावीपणे चित्रण व बाजारभावावर ‘रौंदळ’ चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. राजकीय मनमानीला नडणारा आणि शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडणारा भाऊसाहेब शिंदे यांचा रांगडा अवतार ‘रौंदळ’मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

एखादी भूमिका निवडण्यामागे कलाकार हा चहूबाजूंनी विचार करत असतो. आपण संबंधित भूमिकेला न्याय देऊ शकतो का? हे पारखून पाहतो. भाऊसाहेब शिंदेसुद्धा एखाद्या चित्रपटाची संहिता निवडताना प्रथमत: कथेचे परिणाम आणि संबंधित भूमिकेच्या साच्यामध्ये आपण परिपूर्णपणे बसतोय का? हे तपासून पाहतात. कथेबाबत सखोल विचार करून, भूमिका कशा पद्धतीने पार पाडता येईल? याचा अंदाज घेऊन मग महिन्याभरानंतर दिग्दर्शकाला होकार कळवतो, असं ते सांगतात. ‘‘माझ्याकडे ग्रामीण बाजाच्या भूमिका व संहिता येत असतात. परंतु मला सगळय़ा प्रकारच्या भूमिका करायला आवडतात. भविष्यात जर वेगळी भूमिका साकारण्यासाठी माझ्याकडे आली, तर चौकटीच्या पलीकडे जाऊन मला निश्चितच काम करायला आवडेल,’’ असेही त्यांनी सांगितले.

नेहमी नवख्या कलाकारांबरोबर काम करणारे भाऊसाहेब त्यामागचा आपला दृष्टिकोन स्पष्ट करतात. ‘‘कॅमेऱ्याचा अनुभव नसलेल्या नवख्या कलाकारांना थोडा वेळ दिल्यास ते व्यवस्थित तयार होतात. नवे कलाकार खूप ताकदीने काम करत असतात आणि कलाकृतीसाठी पुरेपूर वेळ देतात. कोणताही कलाकार हा भूमिकेला अनुरूप असेल तर त्याच्यासोबत काम करायला काही अडचण येत नाही. मुळात कोणतीही भूमिका करताना संबंधित चित्रपटासाठी कलाकार हा नवखाच असतो. कारण त्या भूमिकेशी त्याचा पहिल्यांदाच संबंध येत असतो,’’ असं त्यांनी सांगितलं.

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटांमधील सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली आणि गुणगुणायला भाग पाडले. आता ‘रौंदळ’ चित्रपटातील गाण्यांनासुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या गाण्यांमागची प्रक्रिया सांगताना भाऊसाहेब म्हणतात, ‘‘आम्ही एकाच वेळी २५ गीतकार व संगीतकारांकडून चित्रपटासाठी गाणी तयार करून घेतो. मग यातून चित्रपटाला तसेच विशेषत: कथेला साजेशा गाण्यांची व चालींची निवड केली जाते. पुढे मग चित्रपटावर काम सुरू करून गाण्यांची निर्मिती केली जाते.’’

गजाजन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा चित्रपट येत्या ३ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भाऊसाहेब शिंदे हे मुख्य भूमिकेत असून, नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री त्यांच्या जोडीला आहे. तर अनिकेत खंडागळे यांनी चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून, फैझल महाडिक यांनी संकलन केले आहे.

‘तरच प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतात’

आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिकेसाठी प्रामाणिकपणे मेहनत घ्यायची असते. प्रामाणिकपणा आपल्या कामात असल्यास आपण निश्चितच त्या भूमिकेला न्याय देऊ शकतो आणि मग भूमिका चोखपणे साकारल्यास प्रेक्षक चित्रपटास चांगला प्रतिसाद देतात. आपल्याला लक्षात ठेवतात, असे मत भाऊसाहेब शिंदे यांनी मांडले. ग्रामीण चित्रपटांना प्रतिसाद चांगला मिळतो. कारण आज शहरात राहणारी मंडळी एकेकाळी ग्रामीण भागातच होती. त्यांची नाळ गावाशी जोडलेली असल्याने त्यांच्याकडून ग्रामीण बाजाच्या चित्रपटांना भरभरून पसंती मिळते, असेही ते सांगतात.

‘पैसा कमविणे ध्येय नाही’

‘रौंदळ’ हा चित्रपट सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सुखदु:खांवर आधारित आहे. यामुळे शेतकऱ्यांनी चित्रपटगृहापर्यंत यावे. बक्कळ पैसा कमवण्यापेक्षा ज्यांच्यासाठी हा चित्रपट तयार केला आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचावा, ही अपेक्षा असल्याचे भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader