‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. मणीरत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्तिच्या कादंबरीवर आधारित १० व्या शतकातल्या चोळ साम्राज्याच्या इतिहासावर बेतलेली असणार आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. यादरम्यानच्या एका कार्यक्रमावेळी चियान विक्रम यांने केलेल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : चित्रपटांत अपयश मिळाल्यावर अनन्या पांडेची ओटीटीकडे वाटचाल, ‘या’ सिरीजमध्ये साकारणार मुख्य भूमिका

या भाषणात विक्रम चोल साम्राज्य आणि आपल्या इतिहासाबद्दल बोलला आहे. तसेच, यात तो पाश्चात संस्कृती आणि भारतीय संस्कृतीवर यावरही भाष्य करताना दिसत आहे. विक्रम म्हणाला, “आपण सगळे पिरॅमिड बघायला जातो, पिसाचा झुकलेला बुरुज बघायला जातो. तुम्ही अशा इमारतींचे कौतुक करता जी उभीही नाही. आपण तिथे जाऊन फोटो आणि सेल्फी घेतो. पण आजही भारतात अशी मंदिरे आहेत, जी शेकडो वर्षांपासून जशीच्या तशी उभी आहेत. अनेक भूकंप येऊन गेले, पण या मंदिरांना काहीही झाले नाही.” विक्रम ज्या मंदिराबद्दल बोलत आहे, ते तंजावरमधील बृहदीश्वर मंदिर आहे. या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. ग्रॅनाइटपासून बनवलेले हे मंदिर जगातील अशा प्रकारचे एकमेव मंदिर आहे. तमिळ वास्तुकलेच्या सर्वात भव्य उदाहरणांमध्ये त्याची गणना केली जाते.

त्या मंदिरांबद्दल बोलताना विक्रम म्हणाला, “या मंदिरासाठी चोल राजाने एक ६ किलोमीटर लांब उतार बांधला होता. त्यावरुन बैल हत्ती आणि मानवांच्या मदतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले. कोणत्याही यंत्राशिवाय, कोणत्याही क्रेनशिवाय आणि प्लास्टरविना हे मंदिर बांधले गेले आहे. अनेक भूकंपाचे धक्के या मंदिराने सहन केले . या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत.

आणखी वाचा : ऐश्वर्या राय, ए आर रहमान, शोभिता धूलिपाला यांचा इकॉनॉमी क्लासने प्रवास, फोटो व्हायरल

या सर्व गोष्टी ९व्या शतकात तयार झाल्या आहेत. आज तुम्ही महासत्तांबद्दल बोलता, पण त्या काळातही आपल्याकडे जगातील सर्वात मोठे नौदल होते. बाली, मलेशिया आणि चीनशी आपला सागरी मार्गाने व्यापार व्हायचा. या घटनेच्या ५०० वर्षांनंतरही अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला नव्हता. आपला ऐतिहासीक वारसा आपणच जपला पाहिजे. उत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत, पूर्व भारत, असे काही नाही. आपण सर्व भारतीय आहोत.” विक्रमच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओसह #Ponniyin Selvan1 ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.

३० सप्टेंबरला ‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, मळ्यालम आणि तेलगू भाषेत रिलिज होणार आहे. या मल्टीस्टारर सिनेमामध्ये चियान विक्रम, महेश बाबू, ऐश्वर्या राय, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज, रवि, तृषा आणि शरद कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.