लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री पवित्रा गौडा चाहत्याच्या खूनप्रकरणी कोठडीत आहेत. रेणुकास्वामी नावाच्या चाहत्याच्या खून प्रकरणात पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपींना देण्यासाठी दर्शनने त्याच्या एका मित्राकडून ४० लाख रुपये उसने घेतले होते. गुन्ह्यात सहभागींना देण्यासाठी त्याने पैसे उसने घेतल्याची कबुली दिली आहे, असं वृत्त टाइम्स नाउने दिलं आहे.

वृत्तानुसार, ४० लाखांपैकी काही रक्कम रेणुकास्वामीला मारलं त्या शेडमधील सुरक्षा रक्षकांना याप्रकरणी गप्प राहण्यासाठी दिली. पोलिसांनी दर्शनच्या घरी सापडलेल्या हिरव्या पुमा बॅगमधून ३७.४ लाख रुपये जप्त केले आहेत. शिवाय, पोलिसांनी दर्शनच्या फॅन असोसिएशनच्या प्रमुखाच्या घरातून साडेचार लाख रुपये जप्त केल्याची माहिती आहे.

चाहत्याच्या खूनप्रकरणी अभिनेता दर्शन व त्याच्या गर्लफ्रेंडला सहा दिवसांची पोलीस कोठडी, जाणून घ्या हत्येचा घटनाक्रम

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, रेणुकास्वामी खून प्रकरणातील दर्शनबरोबर आरोपी असलेली अभिनेत्री पवित्रा गौडा हिने मृताला चपलेने मारहाण केली होती. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटनुसार ती काही वेळ घटनास्थळी होती. पोलिसांनी पवित्राच्या घरातून दर्शनची चप्पल, कपडे, कागदपत्रं आणि इतर साहित्य जप्त केल्याची माहिती आहे.

चाहत्याच्या खूनप्रकरणी अभिनेता दर्शन व त्याच्या गर्लफ्रेंडला सहा दिवसांची पोलीस कोठडी, जाणून घ्या हत्येचा घटनाक्रम

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, पवित्राला या खून प्रकरणात आरोपी क्रमांक एक ठरवण्यात आलं आहे, कारण तिनेच खून करण्यास दर्शनला प्रवृत्त दिलं. दर्शन आरोपी क्रमांक दोन असून त्याने खून केला. या प्रकरणात दर्शन आणि पवित्रासह इतर १५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आता इन्स्टाग्राम पोस्टवरील डिलीट केलेले मेसेज रिकव्हर करण्यासाठी मेटाशी संपर्क साधण्याचा विचार करत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

सेलिब्रिटींचा माग पापाराझी कसे काढतात? सर्वाधिक मागणी कोणाची? फोटोग्राफर म्हणाला, “अनेक भिकाऱ्यांकडे…”

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनचा चाहता असलेल्या रेणुकास्वामीने पवित्राला अश्लील मेसेज पाठवले होते, त्यामुळे दर्शनला राग आला आणि त्याने त्याचा खून केला. ३३ वर्षीय रेणुकास्वामीचा मृतदेह ९ जून रोजी नाल्याजवळ सापडला होता. कामाक्षीपल्य पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पट्टणगेरे भागातील एका शेडमध्ये रेणुकास्वामीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जवळच्या नाल्यात फेकण्यात आला होता. रेणुकास्वामीला मारहाण झाली व त्याचा खून झाला तेव्हा दर्शन व पवित्रा दोघेही तिथे उपस्थित होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे. “अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्यावर त्याच्या शरीरावरील जखमांच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली आणि त्याचं नाव रेणुकास्वामी असल्याचं कळालं,” असं बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद म्हणाले.