गेल्या वर्षी करोनाचे वाढतं संक्रमण पाहता सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. सगळ्या गोष्टी बंद झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा करोनाची दुसरी लाट आल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. गेल्या वर्षी जी समस्या समोर आली होती ती समस्या पुन्हा एकदा सगळ्यांवर आली आहे. त्यात आता दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचा भाचा आणि लोकप्रिय अभिनेता अयूब खान यांना देखील या लॉकडॉउमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतं आहे. एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला आहे.
करोनामुळे काय काय होतं आहे आणि काय होऊ शकतं यावर त्यांनी वक्तव्य केलं आहे. “मी गेल्या दीड वर्षात काही कमवलेलं नाही. माझी जेवढी बचत होती, त्यातले आता थोडेच पैसे उरले आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकर स्थिर झाली नाही, कामाला सुरूवात झाली नाही. तर, इतरांकडून मदत मागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, असे अयूब खान म्हणाले.
१५ दिवस लागू झालेल्या लॉकडाउन बद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, ‘यामुळे कामावर परिणाम होतं आहे. मानसिकदृष्ट्या लोक अस्थिर होतं आहेत. तर, काम मिळण्यासाठी लोक संघर्ष करत आहेत. मला काम करून दीड वर्षापेक्षा जास्त वेळ झाला आहे. मी एक रूपया ही कमावलेला नाही म्हणून माझ्यावर खूप तणाव आहे. या सगळ्या गोष्टी काही सोप्या नाही आहेत. आपल्याकडे जे आहे त्यातच आपल्याला सगळ्या गोष्टी भागवायच्या आहेत.’
अयूब खान हे ५२ वर्षांचे आहेत. अयूब यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर त्यांनी कलर्स टीव्हीवरील उतरण या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.