२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने पहिल्या भागात केलेली हीच धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. ‘दे धक्का २’ आता सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी आयुष्यातील कठीण प्रसंगाबाबत सांगितलं.
गेल्यावर्षी महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचं निदान झालं. या आजाराशी दोन हात करत त्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. महेश यांनी कर्करोगावर कशाप्रकारे मात केली? असा प्रश्न मेधा यांना विचारण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, “महेशचा कर्करोग हा माझ्यासाठी सर्वात दुःखद धक्का होता. महेशला कधीच काही झालं नाही. ताप देखील यायचा नाही. त्याला आवडत नाही त्याच्याबद्दल खूप बोललेलं. पण माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. कर्करोगावर यशस्वीरित्या मात करत या आजाराला त्याने हरवलं.”
पाहा व्हिडीओ
पुढे म्हणाल्या, “महेशकडून मी एक गोष्ट शिकली आहे ती म्हणजे घाबरायचं नाही. त्यावेळी तो म्हणाला काय होईल मरेन नाहीतर जगेन. घाबरून काय होणार आहे. या आजारावर मी मात करेन. कर्करोगाचं महेशला जेव्हा निदन झालं तेव्हा २४ तास मी त्याच्या बरोबर होते. मला एक किस्सा आठवतो. दरवर्षी सेलिब्रिटी क्रिकेट लीग असतं. त्यादरम्यान महेशचे केमो सुरू होते. आम्ही दोघंही तेव्हा रूग्णालयात होतो. किमो सुरू असताना महेश फोनवरून अमोल परचूरेबरोबर बोलत सेलिब्रिटी क्रिकेट लीगचं काम सांभाळत होता. इतका तो बिनधास्त होता.”
“महेश तेच म्हणतो की आपण रोगाला घाबरायचं नाही. त्याच्याशी लढायचं. जे आपल्याकडे नाही आहे त्याचा विचार करत रडत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याचा आनंद घ्या. महेश तसा खंबीर होता म्हणूनच हे सगळं शक्य झालं.” महेश मांजरेकर यांचा हा संपूर्ण प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.