ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वजण कौतुक करत आहे.
आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याचा म्यूझिक लाँच सोहळाही पार पडला. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकतंच दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटात प्रसाद ओकची निवड करण्यामागचे कारण सांगितले आहे. एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या चित्रपटात प्रसादला मुख्य भूमिकेसाठी कास्ट का केलं? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
“…यापुढे कुठलीही अडचण आली तरी मला सांगा”, ‘धर्मवीर’ आनंद दिघेंच्या आठवणीत आदेश बांदेकर भावूक
यावेळी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, “एखाद्या चित्रपटासाठी पात्राची निवड करताना, विशेषत: ती जर बायोपिक असेल तर त्या माणसाच्या दिसण्याच्या जवळ जाणारे पात्र निवडावे लागते. पण त्यासोबतच तो अभिनेताही असायला हवा. नाहीतर मी जसच्या तसं दिसणारे पात्र घेतलं आणि त्याच्याकडून अभिनयच झाला नाही, तर लोकांनी काय बघायचं. त्यामुळे मला असा एक अभिनेता हवा होता जो ५० टक्के दिघे साहेबांच्या दिसण्याच्या जवळ जाईल. मी त्या अभिनेत्याच्या शोधात होतो.”
“त्यानंतर मी पहिलीच ट्रायल प्रसादवर घेतली आणि ५० टक्के नाही तर तो १०० टक्के आनंद दिघे साहेबांच्या दिसण्याच्या जवळ गेला. दुसरं म्हणजे त्याच्यासारखा सर्वात जास्त अनुभव असलेला, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता दिग्दर्शक मला मिळाला. त्यामुळे माझं काम सोप्प झालं”, असे प्रवीण तरडेंनी सांगितले.
दरम्यान त्यापुढे चित्रपटांच्या आवाहनाबद्दल बोलताना ते म्हणाले, “बायोपिक कोणतीही असली तरी तुम्हाला त्यावर मेहनत घ्यावी लागते. मी यादरम्यान अनेक माणसांना भेटलो. जवळपास १६८ मिनिटांचा एक ऑडिओ माझ्याकडे आहे. तो रोज ऐकून आणि त्यातले पॉईंट ऐकायचे. हे सगळं केल्यानंतर दिघे साहेब माझ्यासमोर उलगडत गेले. दिवस रात्र मी काहीही पाहिलं नाही. फक्त झपाटल्यासारख काम करत होतो.”
VIDEO : ‘चंद्रमुखी’चा हटके अंदाज, अमृता खानविलकरने चक्क पुणे मेट्रोत धरला ‘चंद्रा’वर ठेका
‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.