अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाची सर्वांनाच भूरळ पडली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला आहे. या चित्रपटानंतर आता लवकरच ‘कांतारा २’ हा चित्रपट येणार असल्याचे बोललं जात आहे. पण नुकतंच याबद्दल दिग्दर्शक रिषभ शेट्टीने मौन सोडत उत्तर दिले.

‘कांतारा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभरातील प्रेक्षकांवर गारुड केलं आहे. जगभरात या चित्रपटाने ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. नुकतंच ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘टाइम्स नाऊ समिट २०२२’मध्ये एका मुलाखतीदरम्यान रिषभ शेट्टीने ‘कांतारा २’ बद्दल सांगितले.
आणखी वाचा : मी कन्नडमध्येच काम करणार! रिषभ शेट्टीचं कारण ऐकून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल

“कांतारा २ येणार का? किंवा या चित्रपटाचा दुसरा भाग येण्याचे किती टक्के शक्यता आहे? कारण प्रेक्षकांना चित्रपट आवडला आहे. त्यामुळे त्यांना तो पाहायचा आहे”, असा प्रश्न रिषभ शेट्टीला विचारण्यात आला होता.

“आता येत्या २ डिसेंबरला तुलू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. त्यामुळे अजून कातांराच्या चित्रपटाचे काम संपलेले नाही. आम्ही सुरुवातीला हा चित्रपट कन्नड भाषेत केला. या चित्रपटात कन्नड संस्कृती दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तो कन्नड भाषेत प्रदर्शित व्हावा ही माझी इच्छा होती. यामुळे सुरुवातीला तो चित्रपट कन्नडमध्ये प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो अनेकांना आवडायला लागला.

त्यानंतर दोन आठवड्यात आम्ही अनेक भाषेत चित्रपट डब केला आणि तो प्रदर्शित केला. त्यामुळे आतापर्यंत हेच काम सुरु आहे. मी सध्या कांतारा चित्रपटाचाच विचार करतोय. ‘कांतारा २’ बद्दल अजून काहीही विचार केलेला नाही”, असे रिषभ शेट्टीने म्हटले.

आणखी वाचा : “तू आणि मी एकत्र…” मानसी नाईकच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

“तसेच मला कायम कन्नड चित्रपटच करायचे आहेत. कारण मला कन्नड चित्रपटसृष्टीने एक अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून व्यासपीठ दिले आहे. आज मी इथे जो काही आहे त्याचे कारण कन्नड भाषिक प्रेक्षक. आज कांतारा हा जर हिट झाला असेल तर त्याचे एकमेव कारण म्हणजे कन्नड प्रेक्षक आणि कन्नड चित्रपटसृष्टी. त्यामुळेच मला कायम कन्नड चित्रपट करायचे आहेत”, असेही त्याने सांगितले.