कन्नड चित्रपटसृष्टीने गेल्या काही महिन्यात ज्या पद्धतीने स्वतःला सिद्ध केलं आहे ते पाहून अचंबित व्हायला होतं. ‘केजीएफ’, ‘७७७ चार्ली’, ‘विक्रांत रोना’ सारख्या कन्नड चित्रपटांनी स्वतःचा एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. आता त्यात भर पडलीये ती रिषभ शेट्टी अभिनीत आणि दिग्दर्शित ‘कांतारा – अ लेजंड’ या चित्रपटाची. ३० सप्टेंबरला केवळ मूळ भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची लोकप्रियता अगदी ‘केजीएफ’लाही मागे टाकणारी आहे. नुकताच हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या दोन्ही भाषांत डब करून प्रदर्शित करण्यात आला आहे. दाक्षिणात्य चित्रपट हा अजूनही आपल्या मुळांना घट्ट धरून आहे हे सिद्ध करणारा ‘कांतारा’ बघताना बॉलिवूड आणि हिंदी चित्रपटांची कीव येते. आपल्याकडेही अशा कित्येक गोष्टी आहेत, पण आपल्या लोकांना रिमेक आणि ऐतिहासिक चित्रपटातून उसंत मिळेल तेव्हा कुठे ते विचार करू शकतील.

कर्नाटकातील लोककलेला अत्यंत अभिमानाने सादर करणारा ‘कांतारा’ एक धाडसी चित्रपट आहे यात काहीच दुमत नाही. आपल्याकडे असा लोककलेचा प्रकार ‘वाघ्या मुरळी’च्या माध्यमातून आपण अनुभवला आहे. चित्रपटाची कथा फिरते एका ग्रामदैवताभोवती जो हजारो वर्षं या गावाची रक्षा करत आहे. या ग्रामदैवताची सेवा त्या गावातील काही अनुसूचित जाती जमातीमधील लोकं करतात, त्या उत्सवाला ‘कोला’ म्हणतात. या उत्सवात त्या ग्रामदैवताची सेवा करणारी व्यक्ती एका विशिष्ट प्रकारची वेशभूषा करून नृत्य सादर करते, यादरम्यान काही काळ त्या व्यक्तीमध्ये त्या देवाचा वास असतो. गावकरी ही परंपरा अत्यंत श्रद्धेने पाळतात. याबरोबरच गावाच्या या जमिनीवर वनविभाग आणि जमीनदार यांचा डोळा आहे. बरोबर याच तीन गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून ही कथा लिहिली आहे. ग्रामदैवताची सेवा करणारे गावकरी, वनविभाग आणि जमीनदार यांच्यातील संघर्ष आणि त्याला दिलेली लोककलेची जोड अशी कथा असलेला हा चित्रपट अगदी उत्तमरीत्या बांधला आहे.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Tensions rise after cattle parts found under Khed Devane bridge
खेड देवणे पुलाखाली गोवंशाचे अवयव सापडल्याने तणाव
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”

आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने केलं ‘कांतारा’ चित्रपटाचं कौतुक; म्हणाला, “उत्तम संकल्पना आणि…”

आपल्याला कर्नाटकातील त्या लोककलेविषयी किंवा त्यांच्या परंपरेविषयी काही माहिती नसूनही आपण त्या कथेत कधी गुंततो तेच आपल्याला समजत नाही. याचं संपूर्ण श्रेय जातं ते लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी यांना. रिषभ यांनी कथा आणि लोकांच्या श्रद्धास्थानाचं गांभीर्य बाळगून ही कथा सादर केली आहे. रोमान्स, नाट्य, विनोद, थरार या सगळ्या गोष्टी त्यांनी योग्य प्रमाणात आणि योग्य त्याच ठिकाणी पेरल्याने कथा पटकथा तुम्हाला कुठेच भरकटल्यासारखी वाटत नाही. दिग्दर्शन आणि चित्रीकरणात तर या चित्रपटाला पैकीच्या पैकी गुण दिले पाहिजेत. कर्नाटकचं निसर्गरम्य चित्रण, तिथल्या लोकांना मिळालेलं निसर्गाचं वरदान, लोकांच्या प्रथा परंपरा याचं अचूक चित्रण तुम्हाला यात बघायला मिळेल. खासकरून सुरुवातीला म्हशीच्या शर्यतीचं दृश्य फारच अप्रतिमपणे सादर केलं आहे. चित्रपट अगदी गंभीर होऊ नये यासाठी बऱ्याच ठिकाणी विनोद निर्मितीचा वापर केला आहे आणि तो अगदी उत्तम जुळून आला आहे. काही संवाद आणि दाक्षिणात्य चित्रपटात महिलांचं केलं जाणारं चित्रण यावरून कदाचित कुणी आक्षेप घेऊ शकतं, पण ही त्यांची जगण्याची रीत आहे, आणि ती जीवनशैली जशी आहे तशीच मांडल्याने कुठेही त्यात नाटकीपणा तुम्हाला जाणवणार नाही.

याबरोबरच चित्रपटाचं संगीत हा त्याचा आत्मा आहे. मध्यंतरादरम्यानचं दृश्य आणि त्याला साजेसं पार्श्वसंगीत अंगावर रोमांच उभं करणारं आहे. गाणीदेखील त्या कथेला पुढे नेणारी असल्याने कुठेच ती अनावश्यक वाटत नाहीत. चित्रपटाच्या उत्तरार्धात यातील मुख्य पात्र शिवा याचा एका लोहाराच्या दुकानातील अॅक्शन सिक्वेन्स आहे, त्याचं चित्रीकरण आणि पार्श्वसंगीत तुम्ही कदापि विसरू शकणार नाही, इतक्या बारकाईने ते दृश्य चित्रित केलं आहे. अभिनयाच्या बाबतीत तर सगळ्याच कलाकारांनी उत्कृष्ट काम केलं आहे. सप्थमि गौडा ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात जशी दिसते त्याच्या विरुद्ध या चित्रपटातून ती आपल्या समोर येते, आणि तिने तीचं काम चोख बजावलं आहे. जमीनदाराच्या भूमिकेत दिसणारे अच्युत कुमार आणि रांपा या भूमिकेत दिसणारे प्रकाश थूमिनाड या अभिनेत्यांची कामं फारच लाजवाब झाली आहेत. एक चित्रपटाचा खलनायक तर दूसरा वातावरण हलकं फुलकं करणारा अभिनेता हे दोघेही प्रचंड भाव खाऊन जातात. इतरही कलाकारांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे.

चित्रपटाची शेवटची २० मिनिटं ही सुन्न करणारी आहेत, त्या २० मिनिटांत आपल्या डोळ्यासमोर घडणारं नाट्य, त्यामागची पार्श्वभूमी, आणि प्रत्येक कलाकाराने केलेला अभिनय पाहून तुम्ही थक्क व्हाल. खासकरून रिषभ शेट्टी याचं शिवा हे पात्र ज्या पद्धतीने आपल्यासमोर उलगडतं आणि त्याचं एक वेगळंच रूप आपल्याला या २० मिनिटांत पाहायला मिळतं. यासाठी रिषभ यांनी घेतलेली मेहनत पडद्यावर आपल्याला दिसते. रिषभच्या पात्राचा म्हणजेच ‘शिवा’चा भूतकाळ आणि त्यादिशेने होणारा त्याचा प्रवास अद्भुत आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे.

चित्रपटात लोकांच्या धार्मिक रिती रिवाज आणि मान्यतांवर प्रामुख्याने भाष्य केलं असलं तरी ‘निसर्ग हाच परमेश्वर’ आहे हेदेखील या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. वरवर बघायला गेलं तर ही एका गावातील गावकरी आणि जमीनदार यांच्यातील संघर्षाची गोष्ट आहे, पण याला दिलेली रूढी परंपरा आणि लोककलेची जोड यामुळे हा चित्रपट उजवा ठरतो यात तिळमात्र शंका नाही. काहींना हा चित्रपट अजिबात आवडणार नाही, आणि त्यांना आवडावा म्हणून हा चित्रपट नक्कीच बनवला गेला नाही. कर्नाटकातील या प्राचीन परंपरेला अभिमानाने जगासमोर आणायचं आणि त्यामाध्यमातून सर्वसमावेशक अशी कथा लोकांसमोर मांडायची हाच शुद्ध हेतू या चित्रपटाच्या निर्मात्यांचा आहे हे तो बघताना जाणवतं. एकदातरी हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघायलाच हवा. हिंदीतही असा चित्रपट बनू शकतो, नक्कीच आपल्यात ती क्षमता आहे, गरज आहे ती फक्त आत्मपरीक्षणाची. पाश्चात्य संस्कृतीची जी जळमटं आपल्या हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या मेंदूवर बसली आहेत ती साफ केली तर नक्कीच आपणही आपल्या मातीतला ‘कांतारा’ तेवढ्याच अभिमानाने सादर करू शकतो.

Story img Loader