बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानीचे वडील जगदीश सिंह पटानी हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांची पाच आरोपींनी तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. सरकारी विभागात उच्चपदाचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बरेलीमधील कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जगदिश सिंह हे उपअधिक्षक पदावरून निवृत्त झाले होते.
कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख डीके शर्मा यांनी सांगितले की, शिवेंद्र प्रताप सिंह, दिवाकर गर्ग, आचार्य जयप्रकाश, प्रीती गर्ग आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक, गुन्हेगारी हेतू आणि खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यासाठी पथक नेमण्यात आले असून त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असेही डीके शर्मा म्हणाले.
जगदीश सिंह पटानी हे बरेलीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात राहतात. ते म्हणाले, शिवेंद्र प्रताप सिंहला ते व्यक्तीशः ओळखतात. शिवेंद्रने त्यांची भेट दिवाकर गर्ग आणि आचार्य जयप्रकाशशी करून दिली. या दोघांचेही राजकारणात लागेबांधे असून ते सरकारी विभागात उच्चपद मिळवून देऊ शकतात. सरकारी आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा तत्सम उच्चपद मिळवून देण्याचे आमिष दाखवले गेले.
या पाच आरोपींनी जगदीश सिंह यांच्याकडून पाच लाख रोखीच्या स्वरुपात तर २० लाख रुपये तीन बँक खात्यात वळवून घेतले. मात्र पैसे घेऊनही तीन महिने कोणतेच प्रत्युत्तर न मिळाल्यामुळे जगदीश सिंह यांनी व्याजासह आपली रक्कम परत मागितली. मात्र पैसे परत मागताच आरोपींनी पटनी यांनाच धमकाविण्यास सुरुवात केली, तसेच त्यांनाच भीती दाखविली गेली.
पटनी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, आरोपींनी त्यांना एक व्यक्तीची भेट घालून दिली. जो स्वतःला विशेष दर्जाचा अधिकारी म्हणवून घेत होता. त्याने स्वतःचे नाव हिमांशू असल्याचे सांगितले होते. या टोळीने आणखी काही लोकांची फसवणूक केली असल्याचा संशय आल्यानंतर जगदीश सिंह पटनी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.