छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेली १३ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत रोशन सिंह सोढी यांची भूमिका अभिनेते गुरुचरण सिंह सोढी यांनी साकारली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी मालिका सोडली. आता त्यांनी एका मुलाखतीमध्ये मालिका सोडण्या मागचे कारण सांगितले आहे.
गुरुचरण यांनी नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. ‘मी मालिका सोडल्यापासून माझ्या वडिलांवर शस्त्रक्रिया सुरु आहेत आणि आणखी काही गोष्टी होत्या. पण मी त्याबद्दल बोलू इच्छित नाही. मालिकेत जितके दिवस काम केले तेव्हा मजामस्ती केली’ असे गुरुचरण म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ‘मी यापूर्वी मालिकेत सोढी ही भूमिका साकारणारे लाड सिंह यांना मी भेटलो होतो. तो चांगले काम करत होता असे मी त्याला सांगितले होते. त्याला खूप चांगले काम मिळाले होते. मला आठवते की मी त्याला मुंबईतील एका गुरुद्वारामध्ये भेटलो होतो. आता रोशन सिंह सोढी यांची भूमिका साकारणारे बलविंदर सिंह सुरी यांचे नाव मी निर्मात्यांना सुचवले होते. ते मालिकेच्या क्रिएटीव्ह टीममध्ये काम करत होते. पण मी पुन्हा मालिकेत काम करावे अशी अजूनही अनेकांची इच्छा आहे.’
सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बलविंदर सिंह हे रोशन सिंह सोढीची भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यांनी ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात त्यांनी शाहरुख खानच्या मित्राची भूमिका साकारली होती.