प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. हार्दिक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच हार्दिक जोशीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने अभिनेता सुबोध भावेचे कौतुक केले आहे.
हार्दिक जोशी याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने सुबोध भावेच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुबोध भावे हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसत आहे. हर हर महादेव असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हार्दिकने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : चालतंय की! राणादाचा ‘जीव’ बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये रंगणार, पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर!
हार्दिक जोशीची खास पोस्ट
“मराठी पाऊल पडते पुढे….पहिल्यांदा मराठी चित्रपट एवढया मोठ्या प्रमाणात 5 भाषेत येतोय. त्यासाठी हार्दिक कडून हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आठवतं त्यांचं रूप, त्यांचा प्रताप आणि मनात डोकावून जातात त्यांच्या असाधारण शौर्यकथा…तो दरारा, तो रूबाब, त्यांची अखंड हिंदवी स्वराज्याची संकल्पना आणि ती सत्यात उतरवताना केलेल्या लढाया…
झी स्टुडिओज् अभिमानाने सादर करीत आहे, शिवरायांच्या भूमिकेत अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे येत्या दिवाळीत संपूर्ण भारतात घुमणार स्वराज्याचा महामंत्र, आपल्या शिवरायांची शिवगर्जना ‘हर हर महादेव’ ते ही पाच भाषांमध्ये”, असे त्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : दिवाळीत देशभरात घुमणार शिवगर्जना, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
दरम्यान छत्रपती शिवरायांच्या कार्याची ख्याती आणि कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पसरलेली आहे. देशभरातील लोकांसाठी आजही छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट साकारला जात आहे.
या चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यातील एक प्रमुख भूमिकेतील नाव म्हणजे सुबोध भावे असल्याचे समोर आलं आहे. सुनिल फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केले आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतला आहे.