अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हृषिकेश जोशी यांचा राजकीय आणि सामाजिक दांडगा व्यासंग सर्वश्रुत आहे. सद्य परिस्थितीवर नेमकी टिप्पणी करत घटनेच्या अचूक वर्मावर बोट ठेवत निडरपणे सत्य मांडण्याची ताकत त्यांच्यात आहे. असंच एक सत्य मांडत, ‘येतोय तो खातोय’ असं हृषिकेश जोशी सध्या सांगतायेत. ते असं का म्हणतायेत? हे तुम्हाला जाणून घ्याचं असेल तर ९ फेब्रुवारीला येणाऱ्या ‘येतोय तो खातोय’ या नव्या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावावी लागेल. विजय कुवळेकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन हृषिकेश जोशी करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुयोग नाट्यसंस्थेचं ९० वं नाटक

सुयोग नाट्यसंस्थेने आजवर वेगेवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आता लोकनाट्याच्या फॉर्ममध्ये दडलेल्या ‘येतोय तो खातोय’ या आधुनिक लोकनाट्याची भेट नाटयरसिकांसाठी आणली आहे. सुयोगची ही ९०वी कलाकृती आहे. संदेश सुधीर भट सादरकर्ते असलेल्या या नाटकाचे निर्माते कांचन सुधीर भट, मोहन दामले, मिलन टोपकर, चंद्रशेखर आठल्ये आहेत.

येतोय तो खातोय नाटकात ६ गाणी

लोकनाट्याच्या संस्कृतीत नीतीतत्त्वांचा बोध, आदर्शांची जाणीव करून देताना विनोदाच्या माध्यमातून लोकांच्या प्रवृत्तींवर, मर्मावर बोट ठेवणे व सद्विचारांची जाणीव जागृती करण्याचे काम प्रामुख्याने केले जाते. ‘येतोय तो खातोय’ या नाटकातूनही ६ दमदार गाण्याच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय विसंगतीवर भाष्य करण्यात येणार आहे.

राजकारणातल्या डावपेचांचा उपरोधिक समाचार

राजकारणातल्या डावपेचांचा उपरोधिक समाचार घेताना गोष्टीच्या माध्यमातून राजकीय हेवेदावे गमतीशीर व तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न ज्येष्ठ पत्रकार लेखक विजय कुवळेकर यांनी या नाटकातून केला आहे. आजवर लिखाणाच्या माध्यमातून विजय कुवळेकर यांनी बऱ्याच सामजिक गोष्टींचा उहापोह केला आहे. आता ‘येतोय तो खातोय’ या नाटकातून त्यांनी सद्य राजकीय चित्र मांडले आहे. पॉलिटिकल सटायर असलेल्या या नाटकातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे.

या नाटकाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश जोशी सांगतात की, ‘सध्याचं राजकारण आकलनापलीकडेच आहे. ‘येतोय तो खातोय’ या नाटकातून मनोरंजनाच्या माध्यमातून ‘राजकीय पोलखोल’ केली जाणार आहे’. ही पोलखोल करताना कोणाचीही राजकीय बाजू घेण्याचा व कोणाचाही राजकीय विरोध करण्याचा प्रयत्न या नाटकात नसणार आहे.

हृषिकेश जोशी, संतोष पवार, स्वप्नील राजशेखर, भार्गवी चिरमुले,अधोक्षज कऱ्हाडे, मयुरा रानडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वाबुंरकर हे कलाकार ‘येतोय तो खातोय’ नाटकात आहेत. नाटकाचे संगीत अजित परब यांचे तर नृत्यदिग्दर्शन मयूर वैद्य यांचे आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून प्रकाशयोजना प्रफुल दीक्षित यांची आहे. वेशभूषा महेश शेरला तर रंगभूषा शरद सावंत यांची आहे. दिग्दर्शन साहाय्य श्रद्धा पोखरणकर यांचे आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor hrishikesh joshi direct new marathi drama yetoy to khatoy cast santosh pawar and bhrgavi chirmule scj